भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाजपेयींना पाकिस्तानसोबत मैत्री करायची होती. पण दुर्दैवाने हे प्रत्यक्षात झाले नाही. आता देशातील मोदी सरकार आणि पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करावे. वाजपेयींसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. वाजपेयींच्या निधनाने शोककळा पसरली आहे. वाजपेयी यांचे आंतरराष्ट्रीय मंचावरील मुत्सद्देगिरीतही योगदानही महत्त्वाचे आहे. पाकिस्तान आणि चीन या युद्धखोर शेजाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर फारुख अब्दुल्ला यांनी ‘एएनआय’ ला सांगितले की, भारत हा प्रत्येकाचा देश असावा, असे वाजपेयींना वाटत होते. त्यांना पाकिस्तानशी मैत्री करायची होती. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. आता आगामी काळात भारतातील मोदी सरकार आणि पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करतील अशी आशा आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये थेट लाहोरची बस यात्रा केली. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी केलेल्या सहकार्याच्या कराराची शाई वाळण्याच्या आत पाकिस्तानने कारगिल येथे घुसखोरी केली. कारगिल युद्धात वाजपेयींनी सैन्याला जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले करण्यास मनाई केली. त्याने सैन्याला अडचणीच्या परिस्थितीत लढावे लागले. मात्र त्या निर्णयाने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यास मदत केली होती.