News Flash

जम्मू-काश्मीरबाबत केंद्राचं एक पाऊल पुढे! विभागणीनंतर पहिल्यांदाच बोलावली बैठक!

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्थिरता येण्याच्या दृष्टीने केंद्रशासित प्रदेशांत विभागणीनंतर केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील प्रमुख पक्षांची बैठक बोलावली आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांची बोलावली बैठक

जवळपास दीड वर्षापूर्वी म्हणजेच ऑगस्ट २०१९मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेचं ३७० हे कलम काढून टाकलं आणि राज्याची लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली. या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. काश्मीरमधूनही या निर्णयाला मोठा राजकीय विरोध झाला. तेव्हापासून आजतागायत सरकारने काश्मीरमधील राजकीय पक्षांसोबत या मुद्द्यावर चर्चा केली नव्हती. मात्र, या मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल आणखी पुढे टाकलं असून विभागणीनंतर पहिल्यांदाच काश्मीरमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना केंद्रानं चर्चेचं आमंत्रण दिलं आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनाही चर्चेचं निमंत्रण

जम्मू-काश्मीरची विभागणी झाल्यापासून तिथे प्रशासनामार्फत कारभार सुरू असून सरकारस्थापनेसाठी अद्याप निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात केंद्र सरकारनं काश्मीर खोऱ्यातील राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावलं असून २४ जून ही तारीख बैठकीसाठी निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. काश्मीरमधील गुपकार गटासोबतच पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांना देखील बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

 

काश्मीरमधील राजकीय व्यवस्था सुरळीत होणार?

काही दिवसांपूर्वीच नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि पीएजीडीचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. “आम्ही अजूनही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. जर त्यांनी आम्हाला चर्चेसाठी आमंत्रण दिलं, तर त्यावेळी आम्ही त्यासंदर्भात निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया फारूख अब्दुल्ला यांनी १० जून रोजी झालेल्या गुपकार गटाच्या बैठकीनंतर दिली होती. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय व्यवस्था लावण्यासंदर्भात लवकरच सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

 

दरम्यान, या बैठकीमध्य जम्मू-काश्मीरमधील विद्यमान मतदारसंघांची पुनर्रचना या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 1:39 pm

Web Title: modi government calls meeting with mainstream parties in jk valley pmw 88
Next Stories
1 स्विस बँकांमध्ये भारतीयांची २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम?; केंद्र सरकार म्हणाले…
2 “निर्बंध शिथिल होताच गर्दी वाढू लागली आहे, काळजी घ्या”, केंद्रीय सचिवांचा राज्यांना सतर्कतेचा इशारा!
3 Covid 19: तिसरी लाट टाळता येणं अशक्य, पुढील सहा ते आठ आठवड्यात…; एम्सच्या प्रमुखांचं मोठं विधान
Just Now!
X