गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांमागे भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यावरून लालू यांनी मोदी सरकारने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोपही केला होता. मात्र, याच मोदी सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना नकळतपणे व्हीआयपी सुविधा दिली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. देशातील विमानतळांवर ३० प्रकारच्या व्हीआयपी श्रेणीतील व्यक्तींना विशेष सूट दिली जाते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्या लोकांचा समावेश असतो. या व्हीआयपींना एसपीजीची विशेष सुरक्षाही पुरवली जाते. तसेच या व्यक्तींचे वाहन कोणत्याही सुरक्षा तपासणीशिवाय थेट विमानापर्यंत नेले जाऊ शकते. या वाहनातून स्वत:चे सामान नेऊन कोणत्याही सुरक्षेशिवाय ते विमानातही लादता येऊ शकते. देशातील विशेष व्यक्तींनाच ही सुविधा पुरवली जाते. मात्र, या यादीत नाव समाविष्ट नसूनही गेल्या आठ वर्षांपासून पाटणा विमानतळावर लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना ही सुविधा पुरवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून लालूंना ही सुविधा काढून घेण्यात आली.

२००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ही सुविधा देण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीकडे (बीसीएएस) यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे विमानात प्रवेश करण्यापूर्वीच्या सुरक्षा तपासणीतून सूट मिळणाऱ्या विशेष व्यक्तींच्या यादीत लालू प्रसाद यादव यांचा समावेश नाही. मात्र, तरीही त्यांना ही सुरक्षा दिली जात असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. तसेच काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आलेली एक व्यक्ती कोणत्याही सुरक्षा तपासणीशिवाय थेट विमानात चढली होती, असेही यामध्ये म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआईएसएफ) यासंदर्भात ई-मेल करून कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने लालूंची ही सुविधा काढून घेण्यात आली.