नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करणाऱ्या धोरणांनी जो गोंधळ निर्माण झाला आहे तो मिटवण्यासाठी आता त्यांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून ३.६ लाख कोटी हवे आहेत,  या पैशावर सरकार टपून आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. सरकार रिझव्‍‌र्ह बँकेकडून ३.६  लाख कोटी रुपये घेण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या आल्या आहेत, त्यावर गांधी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनीही आता पंतप्रधानांची पाठराखण करून देशाला वाचवावे. पंतप्रधानांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून ३.६ लाख कोटी  रुपये हवे आहेत, त्याचे कारण त्यांच्या आर्थिक धोरणातून मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे, तो मिटवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.

सध्या रिझव्‍‌र्ह बँक व सरकार यांच्यात संघर्षांच्या ठिणग्या पडत असून, अर्थ मंत्रालयाने रिझव्‍‌र्ह बँकेकडे त्यांच्याकडील ९.५९ लाख कोटींच्या राखीव रकमेतून ३.६ लाख कोटींची मागणी केली असल्याचे समजते. राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की देशातील प्रत्येक लोकशाही संस्थेचा मोदी सरकारने धाकदपटशाने नाश केला त्यांची स्वायत्तता संपवली.

मोदी सरकार व रिझव्‍‌र्ह बँक यांच्यातील मतभेद रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी बँकेच्या स्वायत्ततेबाबत उपस्थित केलेल्या शंकांमुळे चव्हाटय़ावर आले होते. जी सरकारे मध्यवर्ती बँकांची स्वायत्तता जपत नाहीत त्यांना नंतर आर्थिक बाजारपेठांचा रोष सहन करावा लागतो असे आचार्य यांनी म्हटले होते.