देशाची अर्थव्यवस्था चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीत २३.९ टक्क्यांनी आकुंचित पावली असून या ‘आर्थिक शोकांतिके’बद्दल कोणालाही आश्चर्य वाटलेले नाही. फक्त मोदी सरकारलाच विकासाचे ‘हिरवे कोंब’ दिसत होते. मोदी सरकारने आर्थिक घसरण थांबवण्यासाठी वित्तीय वा कल्याणकारी पावले उचलली नाहीत. पण, हे सरकार कधीही चुकांची कबुली देणार नाही, अशी परखड टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.

चालू आर्थिक वर्षांच्या (२०२०-२१) पहिल्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादनातील प्रचंड घसरणीचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर हल्लाबोल केला. पहिल्या तिमाहीत सुमारे २४ टक्क्यांची घसरण म्हणजे गेल्या १२ महिन्यातील देशांतर्गत सकल उत्पादन नष्ट होण्याजोगे ठरेल. याचा दुसरा अर्थ गेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरीपासून आत्तापर्यंत देशांतर्गत सकल उत्पादनात २० टक्के घसरण झाली असा होतो, असे विश्लेषण चिदंबरम यांनी केले.

उत्पादनात ३९.३ टक्क्यांनी, बांधकाम क्षेत्रात ५०.३ टक्क्यांनी, व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, दूरसंचार या क्षेत्रात ४७ टक्के घसरण झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक घसरणीला ‘देवाची करणी’ जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्रावर कृपा केल्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत, अशी उपरोधिक टीका माजी अर्थमंत्र्यांनी केली.

रिझव्‍‌र्ह बँकेने काही दिवसांपूर्वीच वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात पहिल्या तिमाहीतील विकासदरातील घसरणीबद्दल चिंता मांडली आहे. १९३०च्या दशकातील जागतिक महामंदीत आणि २००८ मधील जागतिक आर्थिक संकटात झाले नव्हते इतके आर्थिक नुकसान या तिमाहीत पाहायला मिळेल, असे नमूद केले आहे. आर्थिक आपत्तीची सूचना विविध क्षेत्रांतून मिळत असताना देखील केंद्र सरकार मात्र बहिरेपणाचे नाटक करत होते. त्याची मोठी किंमत आता गरिबांना आणि दुर्बल घटकांना मोजावी लागेल. या घसरणीतून अर्थव्यवस्थेला बाहेर पडायला खूप वेळ लागेल, अशी टिप्पणी चिदंबरम यांनी केली.

विकासदरातील घसरण (टक्के)

वर्ष १९ दुसरी तिमाही- ७.१

वर्ष १९ तिसरी तिमाही- ६.६

वर्ष १९ चौथी तिमाही- ५.८

वर्ष २० पहिली तिमाही- ५.२

वर्ष २० दुसरी तिमाही- ४.४

वर्ष २० तिसरी तिमाही- ४.१

वर्ष २० चौथी तिमाही- ३.१

विकासदरातील घसरण वार्षिक (टक्के)

२०१७- ८.३, २०१८- ७,

२०१९- ६.१ आणि २०२०-४.२