दुबईच्या राजाची  मुलगी लतिफा काही दिवसांपूर्वी घरातून पळाली होती आणि गोवामार्गे अमेरिकेत जाण्याची योजना आखत होती. मात्र, मोदी सरकारनं आखाती देशांशी असलेल्या धोरणात्मक संबंधांचा विचार करून कोस्ट गार्डच्या सहाय्यानं लतिफाला ताब्यात घेतल्याचं व तिला तिच्या मैत्रिणीसह दुबईच्या स्वाधीन केल्याचं वृत्त ‘बिझिनेस स्टँडर्ड’नं दिलं आहे. ऐश्वर्यात वाढलेल्या या राजकन्येला सर्वसामान्य व्यक्तींसारखं आयुष्य जगायचं होतं. संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान व दुबईचे राजे असलेल्या मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांची मुलगी लतिफा हिनं काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. यात आपले कुटुंबिय आपल्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप तिनं केला होता. इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल होण्याआधी ती बोटीनं देश सोडून पळून गेली होती.

त्यामुळे या राजकन्येचा शोध घेण्यासाठी राजे मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांनी आपली आर्थिक आणि राजकीय ताकद पणाला लावली होती. या महिन्याच्या सुरूवातीला गोव्याच्या किनाऱ्याजवळ ती असल्याची माहिती मोहम्मद मक्तुम यांना मिळताच तिची भारतातून सौदीत पाठवणी करण्यासाठी शेख मोहम्मद यांनी पंतप्रधान मोदींना गळ घातल्याचं सांगण्यात येत आहे. या राजकन्येच्या प्रकरणात मोदींनी स्वत: हस्तक्षेप करत तिच्या पाठवणीसाठी गुप्त मोहीम राबवल्याची धक्कादायक माहिती ‘बिझनेस स्टँण्डर्ड’नं दिली आहे. राजकन्या लतिफा आश्रितासाठी दयायाचना करत असताना तिला बळजबरीनं भारतीय तटरक्षक दलानं सौदी सैन्याच्या ताब्यात दिलं असल्याचा आरोप काहींनी केला आहे.

‘माझं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं आहे. मला सामान्य व्यक्तीसारखं आयुष्य जगायचं आहे. पण मला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नाही. कुटुंबियांकडून माझा छळ केला जात आहे अशी धक्कादायक माहिती तिनं व्हिडिओद्वारे दिली. त्यानंतर ती बेपत्ता होती. एका बोटीद्वारे ती दुबई सोडून भारतात येण्यास यशस्वी झाली होती. पण तिचं अपहरण झालं असून तिच्या सुटकेसाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा असा संदेश राजे मोहम्मद मक्तुम यांनी दिला. आखाती देशांशी असलेले संबध पाहता या प्रकरणात मोदींनी स्वत: जातीनं लक्ष घातलं. तिच्या पाठवणीसाठी तीन तटरक्षक दलाचे जहाज, हेलिकॉप्टर आणि काही सैनिकांची तुकडी सोबत घेऊन ही गुप्त मोहीम मोदींच्या आदेशावरून राबवण्यात आल्याचा दावा संबधित वृत्तपत्रानं केला आहे.

राजकन्या लतिफा सोबत तिच्या दोन परदेशी मैत्रिणी देखील होत्या. ‘सशस्त्र सैनिक बोटीत शिरले आणि त्यांनी लतिफाला ओढत बोटीच्या बाहेर नेलं. यावेळी ती आश्रितासाठी दयायाचना करत होती. मला हवं तर मारून टाका पण मला मायदेशी परत पाठवू नका’ अशीही विनंती तिनं केली होती. पण ती धुडकावून लावत तिला दुबईच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीनं ‘हेलसिंकी टाइम्स’ला दिली. लतिफासोबत असलेल्या तिच्या दोन्ही परदेशी मैत्रिणींना दुबईच्या सैनिकांनी ताब्यात घेतलं होतं पण, आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव पाहत सौदी सरकारनं या दोघींचीही सुटका केली.

‘भारत सरकारला लतिफाला कौटुंबिक जाचाला सामोर जावं लागत असल्याची कल्पना होती, जर तिनं आश्रिताची याचना केली असेल तर आतंरराष्ट्रीय आणि भारतीय कायदासुद्धा तिला आखातात परतण्यापासून रोखू शकत होता,’ असं लंडनस्थित कायदेतज्ज्ञ अभिमन्यू जॉर्ज जैन म्हणाले. लतिफा भारतातून अमेरिकेत पळून जाणार होती. अमेरिकन सरकराकडे ती आश्रय मिळावा अशी याचना करणार होती, अशी माहिती तिच्या एका मैत्रिणीने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली आहे.

लतिफाला जबरदस्ती मायदेशी पाठवण्यासाठी जी गुप्त मोहीम आखण्यात आली तित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाबाबत सरकारी पातळीवर मौन पाळण्यात येत आहे. भारताचे खनिज तेलासाठी असलेले आखाती देशांवरचं अवलंबित्व तसेच दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांवर अंकुश ठेवण्यासाठी आखाती देश भारताला सहकार्य करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आखाती देशांना सहकार्य करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.