भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याबाबत आणि सर्वसमावेशक विकास निश्चित करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने ‘केवळ नाटकबाजी’ आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेली युक्ती होती, अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी त्यांच्यावर हल्ला चढवला.

पक्ष बळकट करण्यासाठी, तसेच देशाला पक्षपात, बदल्याचे राजकारण व अरेरावी यापासून मुक्त करण्यासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेसच्या ८४ व्या महाअधिवेशनातील भाषणात गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. सध्याच्या सरकारने उभ्या केलेल्या आव्हानांविरुद्ध जोमाने लढण्याचे आणि देशाला सत्तेच्या भयापासून मुक्त करण्यासाठी लढा हाती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘सब का साथ, सब का विकास’ आणि ‘ना खाऊँगा, ना खाने दूँगा’ यासारख्या घोषणा केवळ नाटकबाजी आणि सत्ता मिळवण्यासाठीची युक्ती असल्याचे सोनिया यांनी मोदी यांच्या सर्वसमावेशक विकास व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या आश्वासनांच्या संदर्भात सांगितले. काँग्रेस अत्याचारी मोदी सरकारशी लढत असून, भाजपने २०१४ साली दिलेली आश्वासने पोकळ होती हे लोकांना कळू लागले आहे, असे त्या म्हणाल्या.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्य नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेची भरभराट झाली, मात्र मोदी सरकार आमच्या धोरणांना दुर्बळ करत आहे, असा आरोप सोनिया यांनी केला. पक्ष आता लोकांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करत असून, भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत काम करेल, असे गांधी यांनी सांगितले. ‘कठीण परिस्थितीत’ पक्षाची धुरा सांभाळणारे नवे पक्षाध्यक्ष व आपले पुत्र राहुल गांधी यांना हरतऱ्हेने पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्षता विरुद्ध जातीयता लढत होणार – सिद्धरामय्या

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्षता विरुद्ध जातीयता अशी लढत होईल आणि त्यामध्ये काँग्रेस पक्ष विजयी होईल, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.कर्नाटक विधानसभेचे निकाल हे २०१९च्या सार्वत्रिक निवडणूक निकालांचा पाया ठरेल, असेही सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनात स्पष्ट केले. पुढील सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही सिद्धरामय्या म्हणाले.