पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या मुद्द्यावरुन बॅकफूटवर गेले आहेत. चीनला प्रत्युत्तर देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. आता अहमद पटेल यांच्यावरही त्यांनी टीका करणं सुरु केलं आहे. यावरुनच हे दिसून येतं आहे की मोदी सरकारला चीनला उत्तर देण्यात काहीही स्वारस्य वाटत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी ट्विट करुन ही टीका केली आहे. गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर भारतात चीनबद्दल प्रचंड असंतोष आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

१५ जूनला गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताने त्याची चुणूक दाखवून दिली आहे. सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असून आपल्याला चर्चेमध्ये रस आहे असे चीन दाखवतोय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला नियंत्रण रेषेजवळ मोठया प्रमाणात सैन्याची जमवाजमव देखील सुरु आहे. दरम्यान या सगळ्या गोष्टींवरुन काँग्रेस सातत्याने पंतप्रधानांना प्रश्न विचारत आहेत. अशात भाजपाकडून काँग्रेसला उत्तरं दिली जात आहेत. ही उत्तरं काँग्रेसला देण्याऐवजी चीनला द्या असा सल्ला आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला दिला आहे.