इंधनाची बेसुमार दरवाढ आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यावरून देशभर भाजप विरोधात निदर्शने सुरू असतानाच नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीत २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘अजेय भारत’ची घोषणा केली गेली. या निवडणुका अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यासाठी त्यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदतही वाढविण्यात आली.

या राष्ट्रीय कार्यकारिणीत काँग्रेस पक्षालाच मुख्यत्वे लक्ष्य करण्यात आले. भाजप देश जोडण्याचे काम करीत असतानाच काँग्रेस मात्र देश तोडण्याचे काम करीत आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला. ते म्हणाले की, अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यावरून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत आणि समाजात दुही माजवू इच्छित आहेत.

पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि २०१९ची सार्वत्रिक निवडणूक यात पक्ष २०१४पेक्षा सरस कामगिरी करील, असा दावाही केला गेला. गेल्या निवडणुकीत भाजपने ५४३पैकी २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही, तर अधिक जिद्दीने काम करावे लागेल, असे शहा यांनी सांगितले. शहा यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०१९मध्ये संपत आहे. मात्र लोकसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यासाठी त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत वाढविण्यावरही शिक्कामोर्तब झाले. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापलेले महागठबंधन ही धूळफेक आहे, अशी टीका शहा यांनी केली.

लाभार्थीचा लाभ घेणार!
भाजपशासित केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजनांचा लाभ २२ कोटी नागरिकांना मिळाला आहे. त्यामुळे या लाभार्थीपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचावे आणि ते मतदानासाठी केंद्रावर येतील, यासाठी प्रयत्न करावेत, असा निर्णयही बैठकीत झाला.

महत्वाचे मुद्दे –

  • कार्यकारिणी अधिवेशनाच्या परिसराला ‘सदैव अटल’ असे नाव देण्यात आले होते. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची स्मृती त्याद्वारे जपली गेली.
  • व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर लालकृष्ण अडवाणी यांनाही स्थान देण्यात आले होते.
  • ही बैठक तीन दिवस चालणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही अखेरची कार्यकारिणी बैठक आहे त्यामुळे निवडणूक रणनीतीवर त्यात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.