मोदी सरकार १ फेब्रुवारी रोजी आपला अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून प्रत्येक सामान्य नागरिकांना आरोग्य विम्याची भेट मिळण्याची शक्यता आहे. ही योजना अस्तित्वात आल्यास कोणताही आजार झाल्यास त्याच्यावर उपचार मिळण्यास अडचण येणार नाही. हा आरोग्य विमा ३ ते ५ लाख रूपयांपर्यंत असू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना आरोग्य विमा देण्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली जाईल. त्याचबरोबर विश्वस्त संस्था स्थापन करून आरोग्य विमा देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते. केंद्र पुरस्कृत ही योजना अंमलात आणली जाईल. यामध्ये एकूण खर्चापैकी ६० टक्के हिस्सा केंद्राचा तर ४० टक्के हिस्सा राज्य सरकारचा असेल, असेही म्हटले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विमा तीन पद्धतीचा असेल. पहिली योजना ही गरिबी रेषेखाली व्यक्तींसाठी असेल. याला कल्याण योजना असे नाव दिले जाईल. दुसरी योजना ही ज्यांना २ लाख रूपयापर्यंत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी असेल. तिला सौभाग्य योजना नाव असेल. त्याचबरोबर २ लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या सर्व वर्गासाठी सर्वोदय योजना आणली जाऊ शकते, असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे. यामध्ये अधिक उत्पन्न असलेल्यांकडून प्रीमियम घेतला जाईल. पण त्याची रक्कम किरकोळ स्वरूपाची असेल. अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेक्षणानुसार देशातील सुमारे ७० टक्के लोकांकडे आरोग्य विमा नाही. त्यामुळे आजारी पडल्यानंतर त्यांच्याकडे उपचारासाठी पैशांची कमतरता भासते. तो मुद्दा विचारात घेत प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमातंर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.