कृषी विषयक कायदे करुन मोदी सरकारने शेतकऱ्यांना वेठीला धरलं आहेच. शिवाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकारामुळे त्यांनी जवानांनाच शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं आहे अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. एक फोटो ट्विटरवर शेअर करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांविरोधात केलेल्या खोट्या एफआयआरमुळे शेतकऱ्यांचं धैर्य खचणार नाही हे लक्षात असू द्या असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणं हा अपराध नाही तर कर्तव्य आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोत एक जवान एका म्हाताऱ्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज करताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करत राहुल गांधींनी म्हटलं आहे की आपल्या देशाचा नारा हा जय जवान आणि जय किसान असा आहे. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकरामुळे जवान शेतकऱ्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत.

केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.