नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डेन्मार्कमध्ये होणाऱ्या सी-४० हवामान परिषदेसाठी हजर राहण्यास आवश्यक असलेली मंजुरी परराष्ट्र मंत्रालयाने नाकारल्याने ते या परिषदेला हजर राहू शकणार नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल मंगळवारी दुपारी दोन वाजता कोपनहेगन येथे रवाना होणार होते. मात्र त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी न मिळाल्याने ते जाऊ शकले नाहीत. केजरीवाल यांना मंजुरी न देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी म्हटले आहे. यामुळे भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यांचे शिष्टमंडळ रवाना होणार होते, ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद होणार आहे. केजरीवाल हे सहलीसाठी जात नव्हते तर दिल्ली सरकारने हवेचे प्रदूषण २५ टक्क्य़ांनी कसे कमी केले आहे याची माहिती ते जगाला देणार होते.