काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नव्याने हल्ला चढविला. देशाला बेरोजगारीची तीव्र समस्या भेडसावत आहे हे सरकारला मान्यच करावयाचे नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

या प्रश्नाचे निरसन करण्यासाठी मोदी यांनी युवकांशी संवाद साधावयास हवा, असेही गांधी म्हणाले.

‘शिक्षा : दशा और दिशा’ या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी शनिवारी येथील जेएलएन स्टेडियमवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. देशातील संपत्ती मूठभर लोकांच्या हातातच असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

चीनचा आर्थिकदृष्टय़ा झपाटय़ाने विकास होत आहे, देशातील अनेक उत्पादनांवर मेड इन चायनाचे लेबल दिसत आहे, आपण चीनच्या पुढे जाऊ शकतो याची आपल्याला खात्री आहे, असेही गांधी म्हणाले. गांधी यांच्या वक्तव्यावर सरकारकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भारतामध्ये दरदिवशी केवळ ४५० रोजगारनिर्मिती होते आणि याच कालावधीत चीनमध्ये ५० हजार रोजगारनिर्मिती होते. ही आकडेवारी आपली नाही तर अर्थमंत्रालयाने लोकसभेत दिलेली आकडेवारी आहे, असा दावाही गांधी यांनी केला.

‘आधी मान्य करा’

बेरोजगारीची तीव्र समस्या देशाला भेडसावत आहे, मात्र ही समस्या आहे हेच पंतप्रधान मानण्यास तयार नाहीत, असा आरोप गांधी यांनी केला. प्रथम ही समस्या आहे हे आपल्याला मान्य केले पाहिजे आणि त्यानंतर त्याचा मुकाबला करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे आणि काँग्रेसचा त्यावर विश्वास आहे, असेही गांधी म्हणाले.