पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. अर्थसंकल्पातील घोषणेची अमंलबजावणी करत हमी भावाच्या ५० टक्क्यांहून अधिक दर देण्याच्या आश्वासनातंर्गत केंद्रीय कॅबिनेटने ही मंजुरी दिली आहे. सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ केली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढवून तो १७५० रूपये क्विंटल इतके केले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकीने होरपळलेल्या शेतकऱ्याला यामुळे मोठा दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या निर्णयाची घोषणा केली. हमी भाव वाढवल्यामुळे सरकारवर १२ हजार कोटी रूपयांचा भार पडणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गत दहा वर्षांत प्रथमच पिकांच्या हमीभावात एवढी मोठी वाढ झाली आहे. या पूर्वी वर्ष २००८-०९ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने १५५ रुपयांची वाढ केली होती. धान, डाळ, मका सारख्या खरीप पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना पिकांवर ५० टक्के फायदा देण्याच्या उद्देशाने यावेळी हमीभावात विक्रमी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांकडून प्रचार करण्यात येत होता. त्यातच अनेक ठिकाणी पक्षाला विरोध होतानाही दिसला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधील पक्षाची प्रतिमा सुधारेल असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांना वाटतो.