केंद्रातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर तब्बल एक हजार कोटी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात देण्यासाठी इतका पैसा खर्च करण्यात आल्याची माहिती आपल्या सूत्रांनी आपल्याला दिल्याचे केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.


दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मोदी सरकारने येत्या शनिवारी संध्याकाळी दिल्लीतील इंडिया गेटवर एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये महानायक अमिताभ बच्चनही सहभागी होणार आहेत. त्यावरून कालच काँग्रेसने भाजपवर टीका केली. एकीकडे पनामा पेपर्स प्रकरणामध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप असताना केंद्र सरकारने त्यांनाच कार्यक्रमामध्ये बोलावल्याने तपास अधिकाऱ्यांपर्यंत काय संदेश जाईल, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीका करताना केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचे सर्व विभागा वर्षाला १५० कोटींपेक्षा कमी खर्च करतात, हे सुद्धा निदर्शनास आणून दिले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसनेही आम आदमी पक्षाच्या जाहिरातबाजीवरून त्यांच्यावर टीका केली होती. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत दिल्लीतील आप सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी १०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.