स्वप्निल घंगाळे

भारतीय रिझर्व्ह बँक ३५० रुपयांचे नाणे बाजारात आणणार असल्याचे नुकतेच जाहीर केले असतानाच आता केंद्र सरकारने आरबीआयकडे आणखीन एका नाण्याची मागणी केल्याचे वृत्त सुत्रांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या घोषणा आणि आश्वसनांची आठवण म्हणून २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी ४२० रुपयांचे नाणे बाजारात आणण्यासाठी केंद्राने कंबर कसली आहे. याबद्दल अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नसली तर लवकरच याबद्दल ‘खरीखुरी’ आणि चुनावी जुलमा प्रकारात न मोडणारी माहिती जाहीर केली जाईल.

आरबीआय एखाद्या विशेष निमित्ताने खास नाणी जारी करते. त्यामुळेच सरकारने ४ वर्षांच्या दैदिप्यमान कामगिरीच्या पार्श्वभूमिवर ४२० रुपयांचे नाणे जारी करण्यासाठी आरबीआयला गळ घातल्याचे कळते. आरबीआयला दिलेल्या पत्रानुसार मागील चार वर्षांपासून जनतेने सरकारवर विश्वास ठेवण्यासाठी बनावट नोटांप्रमाणे सतत काही ना काही वक्तव्ये आणि घोषणा केल्या जात आहेत. विशेष म्हणजे जनतेला त्या खऱ्या वाटत असून या घोषणांवर विश्वास ठेवणाऱ्या ‘भक्तगणां’साठी ही विशेष नाणी बनवण्याचा सरकार विचार करत आहे. या नाण्यांच्या बनावटीमध्ये ५६ आकड्याचा समावेश व्हावा अशी सरकारची मागणी असल्याचे त्यांनी हे नाणे ५६ एमएमचे असावे असा सल्ला आरबीआयला देऊ केला आहे. सध्यातरी हे नाणे चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित असणार असले तरी काळा पैसा परत आल्यानंतर या नाण्याला २४ कॅरेट सोन्याचा मुलाम देण्यात येणार असल्याचे समजते. नाण्याच्या दोन्ही बाजूंना गोलाकार आकारात इंग्लिशमध्ये आणि देवनागरीत ‘कसं फसवलं’ अशा आशयाचा मजकूर लिहीलेला असेल. नाण्याच्या मधल्या भागात एका बाजूला रुपयाचे चिन्ह आणि मध्ये ४२० मुद्रीत असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पतंग उडवणाऱ्या मुलाचे चित्र असेल. तसेच या नाण्यावर २०१४-२०१९ असेही मुद्रीत केलेले असेल. सरकारने जनतेला किती वर्षे अंधार ठेवले यासंदर्भातील कार्यकाळ असल्याचे समजते. या नाण्याचे वजन ५६ ग्राम ठेवावे का यासंदर्भात सरकारमध्ये मतभेद असल्याचे समजतेय. काही नेत्यांच्यामते सरकार जसे लोकांना डोईजड झाले आहे त्याप्रमाणे ५६ ग्राम नाणे जरा जास्त जड होईल. खिसा जड आहे या शब्दप्रयोगाला सत्यात उतरवण्यासाठी आणि खरोखरच सरकारने जनतेचे खिसे ‘भरले’ हे दाखवण्यासाठी नाण्याचे वजन जास्तच हवे असा काहींना युक्तीवाद केला आहे.

वाढता भक्त संप्रदाय आणि पुढील पाच वर्षे सत्तेत असण्याची शक्यता लक्षात घेऊन या नाण्यांच्या निर्मितवर सध्या बंधन घालण्यात आले नसून प्रत्येक भक्ताला एखादे तरी नाणे मिळावे असा प्रयत्न सरकार करणार असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून चुकून खरं बोलून जाणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते या नाण्यांचे अनावरण लवकरच केले जाणार असल्याचे समजते. आता सरकारचे हे खरेखुरे ४२०चे नाणे किती खणखणीत वाजते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(सदर बातमी एप्रिलफूल आहे. भविष्यात खरोखर असे काही घडले तर तो योगायोग समजावा)