08 March 2021

News Flash

मोदी सरकार नेरळ-माथेरान रेल्वेसहीत चार हेरिटेज रेल्वे ट्रॅक खासगी कंपन्यांना विकणार

हे चारही ट्रॅक युनिस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेत

केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाबरोबरच अशाप्रकारचे एकूण चार मार्गांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशमधील कालका-शिमला ऐतिहासिक रेल्वे मार्ग, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी-दार्जिलिंग रेल्वे मार्ग, तामिळनाडूमधील नीलगिरी येथील रेल्वे मार्गांचेही खासगीकरण करण्यात येणार आहे. हे सर्व रेल्वे मार्ग आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मात्र आता मोदी सरकार हे सर्व रेल्वे मार्ग खासगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या तयारी आहे. दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या देखभालीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा तोटा रेल्वेला सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

खासगी कंपन्या या चारही मार्गांची देखभाल करण्याबरोबरच त्यांची जाहिरात आणि मार्केटिंग करण्याचंही काम करणार आहेत. या मार्गावर ट्रेन्सची संख्याही वाढवण्यात येणार आहे. या ट्रॅक्सच्या आजूबाजूला पर्यटन केंद्र उभी केली जाणार आहेत. यामधून होणाऱ्या कमाईतील काही हिस्सा कंपन्यांना रेल्वेला द्यावा लागणार आहे. या चारही रेल्वे मार्गांचे खासगीकरण कसे करता येईल आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये त्या कशा चालवता येतील यासंदर्भातील सर्व काम रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी म्हणजेच आरएलडीएकडे सोपवण्यात आलं आहे.

आरएलडीएने या चारही मार्गांच्या खासगीकरणासंदर्भातील अभ्यास सुरु केला आहे. कोणत्या अटींवर खासगी कंपन्यांना हे रेल्वे मार्ग चालवण्यासाठी देण्यात यावेत यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांचा वेळ आरएलडीएला देण्यात आला आहे. सध्या या चारही रेल्वे मार्गांसाठी रेल्वेकडून कोणताही विशेष निधी दिला जात नाही. त्यामुळेच आता हे रेल्वे मार्ग खासगी कंपन्यांना देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. युनिस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या या चारही रेल्वे मार्गांकडे अधिक अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रेल्वे मार्गांच्या देखभालीवर तसेच इतर गोष्टींसाठी होणारा खर्च टाळण्यासाठी हे खासगीकरण करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे म्हणते…

लोकसत्ता डॉटकॉमची बातमी सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर मध्य रेल्वेने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. नेरळ-माथेरान मार्गाच्या खासगीकरणाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. त्यासंदर्भातील स्पष्टीकरण : ही बातमी अंशत: चुकीची आहे. आरएलडीए फक्त या संदर्भातील आर्थिक शक्यतांचा अभ्यास करत आहे. प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या प्रकाशित करण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, असं मध्य रेल्वेने बातमीच्या मथळ्याचा स्क्रीनशॉर्ट ट्विट करुन म्हटलं आहे. मध्य रेल्वेने हे वृत्त पूर्णपणे फेटाळले नसून स्पष्टीकरण देताना नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाच्या खासगीकरणासंदर्भातील आर्थिक शक्यता तपासून पाहिल्या जात असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

भारतामध्ये सिंगापूरपेक्षाही अधिक सुंदर आणि छान हेरिटेज रेल्वे ट्रॅक आहेत. असं असतानाही आंतरराष्ट्रीय पर्यटक भारताऐवजी सिंगापूरला प्राधान्य देतात. भारतातील या हेरिटेज रेल्वे ट्रॅक्सची योग्य जाहिरात केली जात नसल्याने असं होतं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष पॅकेजसारख्या सुविधाही नाहीत. त्यामुळे आता खासगी कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या रेल्वे ट्रॅक्सकडे आकर्षित करण्याचा केंद्र सराकरचा विचार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 1:12 pm

Web Title: modi government to privatize four heritage railway tracks including neral matheran track under public private partnership mode scsg 91
Next Stories
1 एक एप्रिलपासून मोबाइल युझर्सला कॉल आणि इंटरनेटसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
2 युरोपीय संघाचे प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल
3 महिला न्यायाधीशाबरोबर ‘फ्लर्ट’ करणाऱ्या माजी न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
Just Now!
X