लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठी आश्वासने देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत विरोधकांच्या कठोर टीकेचा सामना करावा लागला. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केंद्र सरकारवर चांगलेच कोरडे ओढले.  निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षामुळे जनतेची निराशा झाली आहे. महागाई कमी न होता वाढली. अर्थसंकल्पामुळे अच्छे दिन येणार नाहीच, पण वाईट दिवस सुरू झाले आहेत, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत भाजपला सुनावले.
सत्तेत आल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २५ टक्क्य़ांनी कमी करू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी प्रचारात दिल्याची आठवण यादव यांनी भाजपला करून दिली. ते म्हणाले की, आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कमी तरतूद केली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा बाता मारणाऱ्या भाजपने अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीसाठी किती तरतूद केली, याची आकडेवारी दिलेली नाही. महागाई कमी करण्याचा साधा उल्लेखदेखील नाही. भारतीय सीमेत चीनकडून होणाऱ्या घुसखोरीकडे यादव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. भारताची सीमा सुरक्षित नाही. चीन हळूहळू भारताच्या हद्दीत घुसघोरी करीत आहे. सीमा सबलीकरणासाठी कोणती तरतूद अर्थमंत्र्यांनी केली? शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकारला जाण नसल्याचा आरोप यादव यांनी केला.  ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकारने कोणती योजना आखली आहे? यादव यांनी काँग्रेसलादेखील चिमटे काढले. काही वर्षांचा अपवाद वगळता काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे त्यांना सुस्ती आली आहे. आता रस्त्यावर उतरा, असा सल्ला यादव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाहत पक्षाला दिला. त्यावर सभागृहात हशा पिकला. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणाऱ्या दलालांवर कारवाईची भाषा सरकार बोलत आहे, परंतु आतापर्यंत कुणा साठेबाजाला अटक झालेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत कुणाकडे प्रशासकीय अधिकार आहेत, असा प्रश्न काँग्रेसच्या के.व्ही. थॉमस यांनी विचारला. सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? सरकारमध्ये केवळ एकच प्रमुख आहे का? माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह परदेशात जाताना वरिष्ठ सहकारी मंत्र्यास अधिकार सोपवून जात. त्यात काहीही गैर नाही.