पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांच्या तीन सहकारी मंत्र्यांचे दुःखद निधन झाले. आजच संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या निधनाची बातमी समोर आली. अनंतकुमार यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्याच्याशी लढा देताना त्यांची प्राणज्योत मालवली. कर्नाटकमध्ये भाजपाला बळ देण्यात अनंतकुमार यांचा मोठा वाटा होता. अटलबिहारी वाजयपेयी पंतप्रधान असतानाही अनंतकुमार केंद्रात मंत्री होते. त्यांच्या निधनामुळे भाजपा आणि एनडीएला धक्का बसला आहे. आपण एका चांगल्या आणि कणखर नेत्याला गमावून बसलो आहोत अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काही वेळापूर्वीच दिली आहे. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे तीन सहकारी मंत्री गमावले आहेत.

अनिल माधव दवे हे मोदी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते. मागच्या वर्षी मे महिन्यात त्यांचे निधन झाले. पर्यावरणासाठी आयुष्य अर्पण करणारा नेता अशी दवे यांची ओळख होती. मात्र गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे आयुष्य नर्मदा नदीच्या सेवेसाठी आणि पर्यावरणाचा समतोल कसा राखावा याबाबत जनजागृती करण्यासाठी घालवले.

दवे यांच्याआधी गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. ३ जून २०१४ ला एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात पक्षबांधणीचे मोठे काम केले. तसेच गोपीनाथ मुंडे हे युतीचे सरकार महाराष्ट्रात असताना उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातला एक द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख होती. मोदी सरकार स्थापन झाल्यावर ते केंद्रात ग्रामविकास मंत्री होते. मात्र ३ जून २०१४ ला त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनांवर नजर टाकली तर लक्षात येते की गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सहकारी असलेले तीन मंत्री गमावले.