मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल मोहन भागवतांकडे आहे. भाजपाची सत्ता आहे असे जरी वाटत असले तरीही प्रत्यक्षात देश संघ चालवतो हे वास्तव आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या सत्तेत मोदी हे पंतप्रधान जरी असले तरीही या सरकारचा रिमोट मोहन भागवतांकडे आहे. या असल्या सरकारला उलथवून टाका असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी बोलत असताना ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देण्यात आला.

देशातल्या प्रत्येक सरकारी संस्थेत संघाचा एक तरी माणूस असला पाहिजे हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आमची सत्ता आल्यावर आम्ही संघाशी संबंधित माणसाला हाकलून देऊ असेही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारकडून फक्त द्वेष पसरवला आहे. द्वेषाचं राजकारण करून देश जिंकता येत नाही त्यामुळे या सरकारचा पराभव झालाच पाहिजे अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. देशाचा मूलभूत पायाच पोखरण्याचं काम या सरकारने केलं आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. याचसाठी राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचंही उदाहरण दिलं. चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करू दिलं जात नाही असाही आरोप केला होता. लोकशाहीसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब ठरली होती. त्यावेळी त्यांनी जस्टिस लोया यांचेही नाव घेतले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे कामात आडकाठी करत आहेत असाच आरोप त्या न्यायाधीशांनी अमित शाह यांचं नाव न घेता केला होता असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांची लढाई आहे, एकीकडे आम्ही सर्वसमावेशक विकासाची भावना घेऊन पुढे येत आहोत. दुसरीकडे मोदी सरकार फक्त द्वेषाचं राजकारण करत आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यांमधल्या निवडणुका आम्ही जिंकल्या त्यापैकी दोन राज्यांमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की संघाची माणसं सरकारमध्ये असावीत म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कमलनाथ यांनी मला यासंदर्भातली माहिती दिली. अशा माणसांना काँग्रेस काढून टाकणार असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते की मी देशापेक्षाही महान आहे, मात्र तीन महिन्यात जनताच त्यांना उत्तर देणार आहे की देश महान आहे तुम्ही त्यापुढे काहीही नाही असेही राहुल गांधी यांनी भाषणात म्हटले आहे.