केंद्रातील मोदी सरकार हे जगातील विश्वासार्ह देशांच्या सरकारांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वाधिक विश्वासार्ह सरकारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियातील सरकार अव्वलस्थानी आहेत तर भारत यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारची प्रशंसा केली आहे. तसेच भारताच्या विकासाचा हा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, भारतातील तीन तृतीयांश अर्थात ७४ टक्के भारतीयांनी केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी फोरमने जगभरातील देशांची अर्थव्यवस्था, तेथील राजकीय घडामोडी आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांचा निकष लावला आहे.


जगातील इतर देशातील सरकारांच्या विश्वासार्हतेबाबत ग्रीसची परिस्थिती भयावह आहे. कारण या देशातील केवळ १० नागरिकांनीच देशाच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, विविध देशांतील विश्वासार्ह सरकारांच्या यादीत स्वित्झर्लंड आणि इंडोनेशिया हे देश अव्वलस्थानी आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे आश्चर्यकारकपणे जगातील सर्वात शक्तीशाली देशात सत्तांतर घडवून आणून राष्ट्रप्रमुख बनलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवरही अमेरिकन नागरिकांनी पुरेसा विश्वास दाखवलेला नाही.

विश्वासार्ह सरकारांच्या यादीमध्ये अनुक्रमे स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, भारत, ल्युक्झेंबर्ग, नॉर्वे, कॅनडा, तुर्की, न्युझीलंड, आयर्लंड, नेदरलँड, जर्मनी, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक लागतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi govt 3rd most trusted in the world switzerland indonesia top list
First published on: 20-11-2017 at 16:59 IST