लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर प्रचार दौरे करून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी यूपीएच्या १० वर्षांच्या राजवटीवर हल्ला चढविला आणि केंद्रात एकहाती सत्तापरिवर्तन घडवून आणले. आपल्याला केवळ ६० महिने द्या, देशाचा चौकीदार बनण्याची आपली इच्छा आहे, असा देशवासीयांच्या काळजालाच मोदी यांनी हात घातला. त्यामुळे देशात नेतृत्वबदल झाल्यास ‘अच्छे दिन’ येतील, या आशेने मतदारांनी भरभरून भाजपच्या पारडय़ात मते टाकली आणि गुजरातचे मुख्यमंत्री मोदी देशाचे पंतप्रधान झाले. मोदी यांनी ६० महिन्यांची मुदत देशवासीयांकडे मागितली असून, त्यामधील ६० दिवसांचा कारभार उद्या पूर्ण होणार आहे.
पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी यांनी, रेल्वेची दरवाढ करून पहिला झटका दिला. त्याचे तीव्र पडसाद देशात उमटताच ही दरवाढ मागे घेण्यात आली. मात्र सर्वसामान्य जनतेच्या विशेषत: गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात सरकारने वाढ केली. त्यापाठोपाठ पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ झाली.
‘ट्राय’ या दूरसंचार क्षेत्रातील नियामक यंत्रणेचे माजी अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यासाठी वटहुकमाचा आधार घेण्यात आल्याने सरकारचा हा निर्णय चर्चेचा विषय झाला.
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून, राज्यात शिवसेना हा भाजपचा अनेक वर्षांपासूनचा सहकारी पक्ष आहे. मात्र सध्या महाराष्ट्र सदनातील प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याने आता मोदी सरकारला पर्यायाने भाजपला शिवसेनेबाबतही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
२६ मे २०१४ ते २६ जुलै २०१४
*नोकरशहांना थेट पंतप्रधानांशी संवादाची अनुमती
*नातेवाईक अथवा नजीकच्या व्यक्तींची ‘स्वीय सचिव’ म्हणून वर्णी लावण्यास मनाई
*काळ्या पैशांबाबत चौकशीसाठी समितीची घोषणा
*कार्यालयातील वातावरण सकारात्मक राहावे म्हणून ती स्वच्छ तसेच प्रसन्न ठेवण्याचे आदेश
*देशाच्या सामान्य नागरीकास सर्जनशील संकल्पना थेट पंतप्रधानांकडे मांडता येणार
*ई गव्हर्नन्सला प्राधान्य
*अर्थसंकल्पात संरक्षण तसेच विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्य़ांवर
*शेतीसाठी पूरक अशा ७५०० कोटींच्या योजना, काश्मीर आणि ईशान्य भारतासाठी अनेक भरीव तरतुदी
*पहिल्याच परदेश दौऱ्यात ब्रिक्स विकास बँकेचे पहिले अध्यक्षपद भारताकडे आणण्यात यश