गुजरातमधील दंगल भडकण्यास नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच मदत केल्याचा आणि शीखविरोधी दंगल रोखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केल्याचा दावा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कॉंग्रेसची पाठराखण करताना मोदींवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली गुजरात सरकारने २००२ मधील दंगल भडकवण्यास मदत केल्याचा आरोप राहुल गांधी यांना केला. ते म्हणाले, गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलींमध्ये तेथील राज्य सरकार सहभागी होते. १९८४ मधील दिल्लीतील दंगल आणि २००२ मधील गुजरातमधील दंगल यात हाच महत्त्वाचा फरक होता. ८४ मध्ये दिल्लीतील दंगल रोखण्याचा प्रयत्न कॉंग्रेस सरकारने केला होता. मी त्यावेळी लहान होता. पण मला आठवतंय की त्यावेळी दिल्लीतील दंगल रोखण्यासाठी सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न केले होते.
गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलींमध्ये तेथील राज्य सरकार थेटपणे सहभागी होते, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, दिल्लीपेक्षा एकदम विरोधी स्थिती गुजरातमध्ये होती. तिथे सरकारच दंगली भडकण्यास मदत करीत होते. दंगलीच्यावेळी तिथे असलेले नागरिकच राज्य सरकारचा दंगलींमध्ये सहभाग असल्याचे सांगतात.
शीखविरोधी दंगलीत काही कॉंग्रेस कार्यकर्ते
८४ मधील शीखविरोधी दंगलीमध्ये काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग होता, याची कबुलीही राहुल गांधी यांनी दिली. ते म्हणाले, काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा त्या दंगलींमध्ये सहभाग होता. त्यापैकी काही जणांना न्यायालयाने शिक्षाही दिली आहे.