केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये आता चार नव्या लसींचा समावेश करण्यात येणार आहे. पुढील वर्षांपर्यंत देशातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि पोलिओचे समूळ निर्मूलन आदी आरोग्यविषयक लक्ष्य केंद्र सरकारपुढे असल्याने ते पूर्ण करण्यासाठी या लसींचा समावेश आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी या संदर्भात घोषणा केली. केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेद्वारे विविध १३ जीवघेण्या विकारांवर मोफत लस दिली जाते. देशातील दोन कोटी ७० लाख बालक या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतात. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून, ती अजून बळकट करण्यासाठी या मोहिमेत चार नव्या लसी आणल्या जाणार आहेत.
नवा आरोग्यविषयक कार्यक्रम
देशात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण २०१५मध्ये ६६ टक्क्यांनी कमी करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्याशिवाय देशातून पोलिओला हद्दपार करण्याचेही सरकारचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी सरकारी या लसींचा समावेश लसीकरण मोहिमेत केला आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भात ३० वर्षांमध्ये विविध योजना, कार्यक्रम, मोहिमा हाती घेण्याचा सरकारचा विचार आहे. देशात दरवर्षी एक लाख अर्भकांचा मृत्यू होतो, विविध विकारांचे अनेक जण बळी ठरतात, त्याशिवाय दरवर्षी १० लाख जणांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
हे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
रोट व्हायरस :
रोटा व्हायरसमुळे अतिसार होऊन दरवर्षी ८० हजार बालके दगावतात, तर १० लाख बालकांना रुग्णालयात दाखल केले जाते. या विकारावर उपचार करण्याचा खर्च अधिक आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली स्वदेशी लस.
रुबेला :
रुबेला या विकारामुळे अनेक नवजात बालकांमध्ये जन्मजात अंधत्व, बहिरेपणा आणि हृदय-विकार आदी दोष निर्माण होतात
जॅपनिज इन्सेफॅलिटीज :
हा विकार प्रौढांना होतो. देशात १७९ जिल्ह्य़ांमध्ये या विकाराचे रुग्ण आढळले आहेत. या विकारामध्ये मेंदूला सूज येते.