नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणखी गळचेपी होईल, अशा शब्दांत जन्माने भारतीय असलेले प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
रश्दी यांनी दहाव्या पेन वर्ल्ड व्हॉइसेस महोत्सवात सांगितले, की जर भारतात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले तर ते दमदाटी करणारे असेल, कारण तसे संकेत आताच मिळत आहेत. लेखक व पत्रकारांना दमदाटी करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत व अजून मोदी सरकार सत्तेवर आलेले नाही. लोकांना आताच दमदाटीची भीती वाटते आहे. त्यामुळे मोदींचा रोष ओढवेल असे काही करू नये अशीच भीती लेखक व पत्रकार तसेच इतरांच्या मनात राहील. आधीच भारतात स्वनियंत्रणे भरपूर आहेत त्यात मोदी सरकारमुळे आणखी भीतीची भर पडेल याची चिंता वाटते.
मोदींवर टीका करतानाच रश्दी यांनी असेही सांगितले, की मोदींसारखा राजकीय नेता भारतात झाला नाही. भाजपने निवडणुका जिंकाव्यात व मोदी सत्तेवर यावेत, असे आपल्याला वाटते. सत्ताप्राप्तीनंतर ते मवाळ बनतील अशी आशा आहे. मोदी हे विभाजनवादी व्यक्तिमत्त्व असून ते कट्टरतावादी आहेत, त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होऊन भाजपच्या राजवटीत साहित्यनिर्मितीचा संकोच होईल अशी भीती वाटते. खुल्या व सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीचा मर्यादित अर्थ आहे. लोकशाहीत नागरिकांना भाषणस्वातंत्र्यही असले पाहिजे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले व समाजातील मोठा गट भीतीच्या छायेत वावरू लागला तर तसा समाज म्हणजे लोकशाही समाज आहे असे म्हणता येत नाही.
आज साहित्यिक, विद्वान, कलाकार यांच्या स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत. भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले तर ही स्थिती आणखी बिघडेल असे रश्दी म्हणाले. गेल्या महिन्यात रश्दी व शिल्पकार अनिश कपूर यांच्यासह साहित्यिक, कलाकार, यांच्या गटाने मोदींच्या सत्तास्थानी होत असलेल्या उदयाबाबत चिंता व्यक्त करणारे खुले पत्र प्रसिद्ध केले होते.