पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पाच दिवसांसाठी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दरम्यान, शनिवारी त्यांनी सिंगापूरमधील प्रसिद्ध चुलिया मशिदीला भेट दिली. या भेटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदींनी संपूर्ण देशालाच टोपी घातल्याचे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

एका पत्रकाराने कमलनाथ यांना प्रश्न विचारला की, मोदी भारतात मुस्लिमांची टोपी घालत नाहीत आणि परदेशात गेल्यानंतर तिथल्या मशिदींवर चादर चढवतात, हा मोदींचा ढोंगीपणा वाटतो का? यावर कमलनाथ यांनी उत्तर दिले की, ज्या व्यक्तीने संपूर्ण देशालाच टोपी घातली आहे, त्या व्यक्तीने स्वतः टोपी घातली किंवा नाही याने काय फरक पडतो. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी याबाबत ट्विट केले आहे.

मोदींनी भेट दिलेली सिंगापूरमधील चुलिया मशिद ही १८२६ मध्ये बांधलेली असून दोनशे वर्षे जुनी आहे. त्याचबरोबर मोदींनी इंडोनेशियातल्या ग्रँड इस्तिकलाल मशिदीला भेट दिली. ही मशिद आग्नेय आशियातील सर्वांत मोठी मशिद आहे. याची माहिती देताना परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी मोदींची छायाचित्रे ट्विट केली होती. यामध्ये मोदींनी खांद्यावर हिरव्या रंगाची शाल घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०११मध्ये गुजरामध्ये ‘सद्भावना उपोषणा’दरम्यान मुस्लिमांची गोल टोपी घालण्यास नकार दिला होता. त्यावरुन बराच राजकीय वाद झाला होता. तेव्हापासून मोदींनी आत्तापर्यंत अनेक समाजाचे प्रतिक असणाऱ्या टोप्या परिधान केल्या मात्र, मुस्लिमांची टोपी त्यांनी घातलेली नाही.