भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची प्रतिमा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपपेक्षा मोठी झाल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केली. मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपींचा आदर सत्कार करणारे मोदी हे कट्टर जातीयवादी विचारसरणीचे राजकीय नेते असल्याचे ते म्हणाले. एका समारंभाला उपस्थित असताना दिग्विजयसिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरात सरकारच्या दारिद्रयरेषा ठरवणा-या निकषांवरही त्यांनी कडाडून टीका केली. नियोजन आयोगाकडून असे निकष ठरवले गेले असता भाजप त्याविरुद्ध हाकाटी पिटते. तेव्हा आता गुजरात सरकारच्या दारिद्रयरेषा ठरवणा-या निकषांवर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपली भूमिका मांडावी. तसेच सोशल नेटवर्किंग साईटसवरील मोदींच्या समर्थनार्थ असणा-या ६० टक्के पोस्ट्स खोट्या असल्याचा दावासुद्धा दिग्विजय सिंग यांनी केला आहे.