मोदी सरकार सध्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी करीत आहेत. सरकारने अर्थसंकल्पासंदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून सूचना मागवल्या असून, याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपतींची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात चर्चाही केली. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना शेतकरी, तरुण आणि सरकारी कंपन्यांचा आवाज ऐकण्यात काहीही रस नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पासंदर्भात केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील लोकांसोबत बैठकांचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची देशातील महत्त्वाच्या उद्योगपतींसोबत बैठक झाली होती.

या बैठकीचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात राहुल यांनी ट्विट केलं आहे. “मोदी सरकारचं विस्तृत अर्थसंकल्पावरील चर्चा सरकारचे मित्र असलेल्या उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत लोकांसाठी राखीव होती. त्यांना शेतकरी, विद्यार्थी, तरुण, महिला, सरकारी आणि निमसरकारी कंपन्या, लघु उद्योजक आणि मध्यम वर्गीय करदात्यांचा आवाज आणि मते ऐकून घेण्यात कसलाही रस नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.