16 December 2017

News Flash

मोदींनी गोध्रा दंगलीपासून कोणताच बोध घेतलेला नाही- ममता बॅनर्जी

मोदी सरकारने सध्या विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी दहशत पसरविण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप

एक्स्प्रेस वृत्तसेवा, कोलकाता | Updated: January 11, 2017 9:23 PM

Mamata Banerjee : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ही स्वतंत्र संघटना राहिलेली नाही. सीबीआय ही 'कॉन्स्पिरसी ब्युरो ऑफ इंडिया' म्हणजे कट आखणारी संस्था बनली आहे, असा घणाघाती प्रहार ममता यांनी केला.

मोदी सरकारने सध्या विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी दहशत पसरविण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्या बुधवारी कोलकाता येथे रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनादरम्यान बोलत होत्या. यावेळी ममता यांनी धुलागड येथील घटनेवरून भाजपने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मोदीबाबू आम्ही दंगलखोरांना घाबरत नाही. मोदींनी गोध्रा दंगलीपासून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, अशी टीका यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली. यावेळी ममता यांनी मोदी सरकारविरोधात लढा देत असल्यामुळे आपल्याला विमान अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले. या घटनेनंतर दोन वैमानिकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने आणि इतरांनी या घटनेचे बालंट एकमेकांवर ढकलले. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांना कुठलीच कागदपत्रे मिळाली नाहीत. हे सरकार खूप धोकादायक आहे. ते काहीही करू शकतात, असे बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच या सरकारने विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी अभूतपूर्व, निराधार अशी दहशतीची मोहीम आरंभली आहे.  केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ही स्वतंत्र संस्था राहिलेली नाही. सीबीआय ही ‘कॉन्स्पिरसी ब्युरो ऑफ इंडिया’ म्हणजे कट आखणारी संस्था बनली आहे, असा घणाघाती प्रहार ममता यांनी केला.

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासह डावे पक्ष आघाडीवर आहेत. मोदी प्लॅस्टिक मनी आणि देशातील कंपन्यांचे सेल्समन असल्यासारखे वागत असल्याचे ममता यांनी म्हटले होते. तत्पूर्वी ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांचा आधार घेतला होता. देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रहिताचे सरकार स्थापन करण्याची गरज असून या सरकारचे नेतृत्व अडवाणी, जेटली किंवा राजनाथ सिंह या तिघांपैकी एकाने केले पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत मोदींनी पायउतार व्हावे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती.

First Published on January 11, 2017 9:20 pm

Web Title: modi has not taken any lessons from godhra riots mamata banerjee