पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता खाली खेचायला हवं असं मत व्यक्त केलं आहे. देशाच्या राजकारणातली तुमची भूमिका काय असं विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही भूमिका मांडली.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने भाजपाला हरवत राज्यात आपली सत्ता कायम राखली. तेव्हापासून ममता बॅनर्जींच्या देशाच्या राजकारणामधल्या भूमिकेबद्दल चर्चा सुरु झाली. काल त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह इतरही काही शेतकरी नेत्यांची भेट घेतली. नवे शेतकरी कायदे रद्द करण्यासाठीच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा यासाठी आपण विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद पुन्हा सुरू करण्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांची तयारी

ममता म्हणाल्या, आम्ही सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. आम्ही या नव्या कायद्याविरोधात संसदेत ठरावही मंजूर केला आहे. शेतकरी नेत्यांनी ममता यांना करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर दिल्लीच्या आंदोलनाला भेट देण्याची विनंतीही केली आहे. ममता यांनी आश्वासन दिलं आहे की, शक्य झाल्यास या प्रश्नावर आपण विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेटही घेणार आहोत.

आणखी वाचा- Free Covid Vaccine: दुर्दैवाने मोदींनी फार उशीरा निर्णय घेतला असून….; ममता बॅनर्जींची टीका

त्याचबरोबर गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी बोलायला का तयार नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा म्हणाले की, केंद्र सरकार पारंपरिक शेती उद्योजकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करत आहे.