पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वासरा पुढे चालवण्याऐवजी ती संपवल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही नेत्यांची धोरणे वेगळी असली तरी दूर दूरपर्यंत मोदी आणि अटलींची तुलना होऊ शकत नाही असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे. या दोघांच्या कारभारातील फरक हा ‘जमीन आसमान का फरक’ याच शब्दांमध्ये मांडता येईल असं सिन्हा यांनी ‘गल्फ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन दोन वर्षांहून काळ लोटला आहे. आज सिन्हा हे केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या सरकारच्या सर्वात प्रमुख टीकाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. एकेकाळी सिन्हा हे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय होते. अटलजींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिन्हा यांनी अर्थमंत्री तसेच परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे सिन्हा यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अटलजींची तुलना होऊ शकत नाही असं सांगतानाच अटलजी सर्वांचा विचार करुन काम करणारे नेते होते असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहेत”

वाजपेयी यांच्या राजकारणाची पद्धत सर्वसमावेशक अशी होती. आपल्या भारतीय समाजामध्ये आणि देशामध्ये पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार ते सर्वांचा विचार करुन निर्णय घ्यायचे, असं सिन्हा यांनी म्हटलं आहे. तसेच जम्मू काश्मीर प्रश्नाबद्दल बोलताना सध्याच्या परिस्थितीपेक्षा वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवण्याच्या अगदी जवळ आपण पोहचलो होतो असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे. भारतात आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधानांपैकी वाजपेयी यांच्याबद्दल काश्मीर लोकांना विशेष प्रेम आणि आदर आहे असंही सिन्हा म्हणाले आहेत.

ते पत्रक म्हणजे अटलजींच्या नेतृत्वाचा दाखलाच

वाजपेयी यांना पाकिस्तानबरोबरच शांतात प्रस्थापित करायची होती. सध्या ज्याप्रकारे पाकिस्तानकडून काही प्रतिसाद मिळत नाही त्याच वातावरणामध्ये वाजपेयी यांनाही काम केलं. त्यांनी पार्लमेंटवर झालेल्या हल्ल्यांनंतरही लाहोर बस सेवा सुरु ठेवली होती, अशी आठवण सिन्हा यांनी करुन दिली. मात्र वाजपेयी यांच्या प्रयत्नांना तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्या काळामध्ये मुशर्रफ यांच्या हातात लष्कराचे नियंत्रण असल्याने ते अधिक प्रभावी होते. त्यामुळेच त्यांनी हा प्रश्न सोडवण्याची फारशी इच्छा दाखवली नाही. मात्र असं असतानाही २००४ साली वाजपेयी यांनी मुशर्रफ यांच्यासोबत एक संयुक्त पत्रक जारी करत पाकिस्तानच्या भूमीचा भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाणारी असं म्हटलं होतं. हे पत्रक म्हणजे वाजपेयी यांच्या नेतृत्वाबद्दल बरंच काही सांगणारं आहे असं मला वाटतं, असंही सिन्हा मुलाखतीमध्ये म्हणाले.  २००४ साली ६ जानेवारी रोजी मुशर्रफ आणि वाजपेयी यांनी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या सार्क देशांच्या बैठकीदरम्यान संयुक्तपणे पत्रक जारी केलं होतं.

…म्हणून भाजपा सोडली

पंतप्रधान मोदींना वाजपेयी यांच्या काळातील काही मंत्री तसेच सहकाऱ्यांबद्दल मोदींना फारसे प्रेम नाही असं सिन्हा सांगतात. “मोदींना केवळ स्वत:ची मते इतरांवर लादायची असतात. मात्र आमच्यापैकी काहीजण सहजपणे हे ऐकणार नाही त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांच्या मार्गातून बाजूला झालेलं बरं,” असा विचार करुन आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सिन्हा यांनी म्हटलं आहे.

मोदींचा पर्याय दिल्याचा पश्चाताप

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांआधी नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी इच्छा व्यक्त करणारे सिन्हा हे काही मोजक्या नेत्यांपैकी एक होते. मात्र आपल्या या भूमिकेचा आता पश्चाताप होत असल्याचे सिन्हा यांनी त्यांच्या, ‘इंडिया अनमेड: हाऊ द मोदी गव्हर्मेंट ब्रोक द इकनॉमी’ या पुस्तकामध्ये म्हटलं आहे.