News Flash

“मोदींचा हिंदुत्ववाद, विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे करोनाविरुद्धची देशाची लढाई आणखीन कठीण झाली”

केंद्र सरकार आणि भाजपाला विज्ञानाबद्दल फारसं प्रेम वाटत नाही

फाइल फोटो (सौजन्य : पीटीआय)

केंद्र सरकार आणि मोदींच्या हिंदुत्वावादी विचारसरणीमुळे करोनाविरुद्ध भारताची लढाई आणखीन कठीण झाल्याचा दावा इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी केलाय. एका लेखामधून गुहा यांनी सध्याची करोना परिस्थिती हाताळताना मोदी सरकारने केलेल्या चुकांचा पाढा वाचला आहे. द स्क्रोलसाठी लिहिलेल्या लेखामध्ये गुहा यांनी उत्तरेकडील राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपाने धार्मिक मेळ्याला दिलेली परवानगीच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनामधून करोनाविरुद्धचा लढा लढण्याऐवजी केंद्राने आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर हिंदुत्वावादी भूमिकेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचा युक्तीवाद गुहा यांनी केलाय.

कुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी परवानगी दिल्याने करोनाचा प्रादुर्भाव उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक झाल्याचं गुहा यांनी लेखात म्हटलं आहे. “एकीकडे असंख्य लोकांवर अंत्यसंस्कार केले जात असताना आणि मृतदेह नद्यांमध्ये तरंगत असताना किंवा वाळूमध्ये पुरले जात असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने आणि भाजपाची सत्ता असणाऱ्या स्थानिक राज्य सरकारने कुंभ मेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना या मेळ्याचं आयोजन करण्यापासून रोखण्यासंदर्भातील पावलं उचलता आली असते. मात्र त्यांनी तसं केलं नाही कारण त्यांना त्यांची श्रद्धा आणि फाजील धर्माभिमान हा विज्ञानापेक्षा अधिक महत्वाचा वाटला,” असं गुहा यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

विज्ञानाबद्दल केंद्र सरकार आणि भाजपाला आस्था नाही

करोनाची लाट येण्याच्या अनेक महिने आधी गुहा यांनी लिहिलेल्या एका स्वत:च्या जुन्या लेखाचा संदर्भही दिलाय. केंद्र सरकार आणि भाजपाला विज्ञानाबद्दल फारसं प्रेम वाटत नाही, असं गुहा म्हणालेत. “मोदी सरकार कशापद्धतीने विज्ञानाचा तिरस्कार करतं आणि वैज्ञानिक संशोधनातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये राजकारण कसं घडवून आणतं याबद्दल मी लिहिलं होतं. मोदी सरकारने देशातील सामाजिक आणि आर्थिक भविष्यासंदर्भातील गांभीर्य ठेवलेलं नाही. सरकारच्या या रानटी, निर्दयी आणि बुद्धीवाद्यांविरोधच्या धोरणांचा परिणाम भारतीयांना आणि भावी पिढ्यांना सहन करावा लागणार असल्याचं मी २०१९ साली एप्रिलमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं. आता तसच घडत आहे. सरकार आजही अशाच पद्धतीने वागत आहे. या धोरणांमुळे देशाचे भविष्य धुसर होत असल्याचं दिसत आहे. आधीच देशातील जनतेसमोर या करोनाच्या साथीमुळे अनेक संकट उभी असतानाच विज्ञानाबद्दल केंद्र सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला फारशी आस्था नसल्याने ही लढाई आणखीन कठीण झालीय,” असं गुहा म्हणालेत.

हा विषाणू २१ व्या शतकातील आहे हे समजून घ्यायला हवं…

योगगुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या लेखात गुहा यांनी मागील काही महिन्यांपासून कशाप्रकारे करोनाविरुद्ध लढण्यासाठी औषधोपचार आणि इतर प्रकारे हिंदुत्वावादाला प्रोत्साहन देण्यात आलं यासंदर्भात भाष्य केलं आहे. अगदी गोमुत्र, शेणाचा लेप अंगावर लावून गुजरातमध्ये केल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या प्रयोगापासून ते हवन करण्यासंदर्भात मध्य प्रदेशमधील महिला मंत्र्याने केलेल्या वक्तव्यासंदर्भातील दाखला गुहा यांनी दिलाय. आयुर्वेदाला माझा विरोध नसल्याचंही गुहा यांनी या लेखात म्हटलं आहे. “आयुर्वेदाला माझा विरोध नाही. मी स्वत: त्याचे फायदे अनुभवले आहेत. मात्र करोना विषाणू हा २१ व्या शतकातील विषाणू आहे. आयुर्वेद, योग, युनानी आणि होमिओपॅथीसारख्या उपचारपद्धतींचा शोध लागला तेव्हा हा विषाणू अस्तित्वात नव्हता. हा विषाणू केवळ एक वर्ष जुना आहे. कडुनिंबाच्या पानांचा धूर करणे किंवा गोमुत्र प्यायल्याने किंवा वनस्पतींपासून बनवलेल्या गोळ्या खालल्याने, अंगावर शेणाचा लेप लावल्याने किंवा नाकामध्ये नारळाचं तेल टाकल्याने या विषाणूवर मात करता येते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाहीय. उलट यासर्वांमुळे संसर्ग झाला असेल तर त्यातून बरं होण्यासाठी अधिक काळ लागतो,” असं गुहा यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 11:14 am

Web Title: modi hindutva irrationality makes indias war on covid 19 even more difficult ramachandra guha scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गुजरातमधील कोचिंग सेंटरमध्ये धाड टाकली असता समोर आलं धक्कादायक चित्र; पोलीसही संतापले
2 दिलासादायक! महिन्याभरानंतर रुग्णसंख्या २ लाखांच्या खाली
3 सत्य घाबरत नाही, टूलकिट प्रकरणी राहुल गांधी म्हणाले…
Just Now!
X