पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बांगलादेश दौऱ्याचा प्रारंभ बांगलादेश युद्धातील हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट देऊन केला. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या युद्धात भारताने मोठी भूमिका पार पाडली होती. मोदी यांनी वंगबंधू स्मृती संग्रहालयास भेट दिली. ते बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे स्मारक आहे. बांगलादेशचा मुक्तिसंग्राम हा जनतेच्या धैर्याचे व निश्चयाचे प्रतीक होता असे मोदी यांनी सांगितले
मोदी येथे आल्यानंतर ते थेट राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे रवाना झाले व तेथे त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या युद्धात प्राणार्पण करणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.  ढाक्यापासून ३५ कि.मी अंतरावर सावर येथे हे स्मारक आहे.
 लष्करी चालीरितीप्रमाणे बांगलादेशचा ध्वज फडकावण्यात आला व नंतर तो अध्र्यावर आणण्यात आला.  मोदी यांनी तेथील पुस्तकात स्वाक्षरी केली. त्यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. या स्मारकात ७ त्रिकोण आहेत व बांगलादेश राष्ट्रीय चळवळीचे त्यावेळचे टप्पे दाखवतात. हे स्मारक म्हणजे धैर्याचे व निश्चयाचे प्रतीक आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.