बलात्काराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान मोदी यांचा सल्ला

देशभरात अल्पवयीन मुलींसह महिलांवर झालेल्या बलात्काराच्या घटनांवर मोदी यांनी सरकार बलात्काऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करेलच, मात्र नागरिकांनी मुलींचा आदर करण्यास शिकले पाहिजे, तसेच मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या मुहूर्तावर मध्य प्रदेशच्या आदिवासीबहुल मंडला जिल्ह्य़ातील रामनगर येथे मोदी यांनी ‘राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’चा शुभारंभ केला. नवी दिल्लीमध्ये असलेले सरकार लोकांचा आवाज ऐकत असून त्याप्रमाणे निर्णय घेत आहे. यामुळे लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा करणारा कायदा करण्यात येत आहे. मात्र समाजानेही एक पाऊल पुढे टाकायला हवे. समाजाने त्यांच्या मुलींचा आदर करायला हवा. त्याचबरोबर आपल्या मुलांनाही चांगले संस्कार देत त्यांना एक जबाबदार नागरिक बनवायला हवे, असे सांगितले.

देशातील पंचायत राजव्यवस्था बळकट करणे आणि ती यशस्वी होण्यातील गंभीर त्रुटींवर उपाय शोधणे हा उद्देश असलेल्या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सुरुवात केली. शेतकऱ्यांना पावसाळ्यात पाणी साठविण्यासाठी नरेगा योजनेचा निधी एप्रिल, मे आणि जून महिन्यात खर्ची घालून दर्जेदार कामे करावीत, असेही मोदी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्टय़ा स्थिर आणि अधिक कार्यक्षम बनवणे हा आहे. मोदी यांनी मध्य प्रदेशातील आदिवासी भागांच्या विकासाचा पुढील पाच वर्षांचा आराखडा जाहीर केला. या योजनेनुसार, आदिवासी पंचायतींच्या अखत्यारित येणाऱ्या भागांच्या विकासावर २ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पंतप्रधानांनी जिल्ह्य़ातील मनेरी येथील द्रवरूप पेट्रोलियम गॅस बॉटलिंग संयंत्राचे भूमिपूजनही केले. याशिवाय सरकारच्या ई-गव्हर्नन्स योजनेची अंमलबजावणी करणे, आपल्या अखत्यारितील खेडय़ांना हागणदारीमुक्त बनवणे तसेच पारंपरिक इंधनापासून एलपीजीकडे वळवून त्यांना धूरमुक्त बनवणे ही कामगिरी करणाऱ्या पंचायतींचा मोदी यांनी सत्कारही केला.