‘बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी मला पंतप्रधान मोदींच्या छायाचित्राची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे,’ असे विधान लोकजनशक्तीचे सर्वेसर्वा चिराग पासवान यांनी शुक्रवारी केले. त्यावर, चिराग हे जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी विधाने करून मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोकजनशक्ती पक्ष बाहेर पडला असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. लोकजनशक्ती आता ‘एनडीए’त नसल्याने मोदींच्या छायाचित्रांचा वापर निवडणूक प्रचारासाठी न करण्याची ताकीद भाजपने दिली होती. त्यावर चिराग यांनी ‘मोदी माझ्या हृदयात वसतात’ असे विधान केले. मात्र चिराग यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका न करता बिहारचे मुख्यमंत्री नितीशुकमार यांना लक्ष्य बनवले. मोदींचे छायाचित्र लावण्याची खरी गरज मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आहे. त्यांनी नेहमीच मोदींचा अपमान केला, राजकीय विरोधही केला आहे, असेही चिराग म्हणाले.

चिराग पासवान यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना जावडेकर म्हणाले की, भाजपचा लोकजनशक्तीशी कोणताही संबंध नाही. भाजप, जनता दल (सं), हिंदुस्थान अवाम मोर्चा व व्हीआयपी यांच्या आघाडीला बिहारमध्ये दोनतृतियांश जागा मिळतील. पासवान दिशाभूल करणारी विधाने करत असून त्याचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही. भाजपचा ‘ब’ वा ‘क’ चमू नसून चिराग यांचा पक्ष मतविभाजन करणारा ठरेल.

मोदींच्या ४ दिवसांत १२ प्रचारसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील प्रचार दौऱ्याची सुरुवात २३ ऑक्टोबरला होत असून चार दिवसांत ते १२ प्रचारसभा घेतील. २३ व २८ ऑक्टोबर, १ व ३ नोव्हेंबर अशा चारही दिवशी मोदींच्या प्रत्येकी तीन सभा होतील.