News Flash

सव्वाशे कोटी लोकसंख्येचा भारत केवळ बाजारपेठ नसून एक सत्ताकेंद्र – मोदी

भारतातील १२५ कोटींची जनता ही केवळ एक बाजारपेठ नाही, तर एक सत्ताकेंद्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

| August 17, 2015 01:24 am

सव्वाशे कोटी लोकसंख्येचा भारत केवळ बाजारपेठ नसून एक सत्ताकेंद्र – मोदी

भारतातील १२५ कोटींची जनता ही केवळ एक बाजारपेठ नाही, तर एक सत्ताकेंद्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सोमवारी संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) मसदार येथे आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते. भारत ही जागतिक स्तरावर झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतामध्ये रेल्वेपासून शेतीपर्यंत सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे आगामी काळात भारत आणि यूएईने एकत्रित काम केल्यास २१ वे शतक हे आशियाचे शतक म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. याशिवाय, मोदींनी गुंतवणूकदारांना गैरसमजांमुळे आजपर्यंत अडकून पडलेल्या सर्व समस्या मी सोडवेन, असे आश्वासनही दिले. यावेळी मोदींनी भारतातील घरबांधणी क्षेत्रात कशाप्रकारे गुंतवणुकीच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. बांधकाम क्षेत्रात आम्हाला तंत्रज्ञान, वेग आणि चांगल्या दर्जाची घरे बांधण्याची गरज आहे. कमी किंमतीत घरांची निर्मिती करणे, भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून ते आज दिवसभरात यूएईतील महत्त्वाच्या व्यक्तींशी व्यापाराच्या विषयावर चर्चा करणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीत राहणारे भारतीय दरवर्षी १३ अब्ज अमेरिकी डॉलर्स भारतात पाठवतात. संयुक्त अरब अमिरातीच्या लोकसंख्येत २६ लाख भारतीय असून हे प्रमाण ३० टक्के आहे. दरम्यान, मोदी आज संध्याकाळी दुबई क्रिकेट मैदानावर दुबईतील ५० हजार भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2015 1:24 am

Web Title: modi in uae 125 crore people is not just a market they are a power
टॅग : Narendra Modi,Uae
Next Stories
1 भाजपच्या विरोधात डाव्यांची मोहीम
2 बिहारला विशेष दर्जाची नितीशकुमारांची मागणी
3 गृहमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात दोनदा वीज गायब!
Just Now!
X