काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमध्ये शुक्रवारी हिसुआ व कहलगाव येथील प्रचारसभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. ते म्हणाले की, सियाचीनमध्ये प्रतिकुल परिस्थितीत तैनात असलेले २० जवान चीनमुळे शहीद झाले. चीनचे सैनिक १२०० किलोमीटपर्यंत भारताच्या हद्दीत आले आहेत, त्यांनी भूप्रदेश बळकावला आहे. हे वास्तव नाकारून पंतप्रधान आपल्या जवानांचा अपमान करत आहेत.

राहुल यांनी सांगितले की, आपल्या जवानांसमोर मोदींची मान लवते, त्यांना ते मानवंदना देतात. पण, ते नेमके काय सांगतात हा खरा प्रश्न आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातून आलेले जवान देशाच्या सीमेचे रक्षण करतात. सियाचीनमध्ये थंडी आणि भुकेचाही त्यांना सामना करावा लागतो. मोदींचे सरकार शेतकरी, छोटे व्यापारी-उद्योजक, शेतमजूर यांचे हित साधणारे नसून देशातील दोन-तीन बडय़ा उद्योजकांच्या फायद्यासाठी चालवलेले सरकार आहे. अवघा देश बडय़ा उद्योजकांच्या ताब्यात जाईल, असे सांगत राहुल यांनी स्थलांतरितांच्या करोना काळात झालेल्या हालअपेष्टांना मोदी जबाबदार असल्याचा आरोप केला.

‘लालू येणार, नितीश जाणार!’

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत नितीशकुमार यांच्यावर शरसंधान साधले. नितीशकुमार आता थकले असून त्यांना बिहार सांभाळणे जमत नाही. करोना आपत्ती असताना हे कधी घराबाहेर पडले नाहीत, आता मात्र मते मागायला लोकांसमोर जात आहेत, अशी टीका यादव यांनी केली. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला असला तरी आणखी एका प्रकरणात ९ नोव्हेंबर रोजी जामिनावर सुनावणी होणार आहे. लालू ९ तारखेला तुरुंगातून बाहेर येणार आणि १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागून नितीशकुमार सत्तेवरून जाणार, असा नारा यादव यांनी दिला.