भ्रष्टाचाराचा नि:पात, विकास ‘अच्छे दिन’ आदी स्वप्नांचे तमाम भारतीयांना गाजर दाखवून बरोबर वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी यांनी चीन आणि दक्षिण कोरियात केलेल्या कथित भारतविरोधी वक्तव्यांवरून त्यांच्यावर सध्या ट्विटरवर टीकेची लाखोली वाहिली जात असून ‘मोदी इन्सल्ट्स इंडिया’ या हॅशटॅगवर यासंबंधी मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल ३८ हजार टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक अनिवासी भारतीयांनीही नाराजी नोंदविली आहे. भारतीय असल्याचा आम्हाला कायमच अभिमान होता आणि आहे, परंतु अशी वक्तव्ये करून तुम्ही आमचा, आधीच्या पिढय़ांचा आणि भारतीय संस्कृतीचाही अपमान केला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहे.
‘गेल्या जन्मी काहीतरी पाप केले म्हणून आपला भारतात जन्म झाला, असे आधी लोकांना वाटत असे. हा काय देश आहे, हे काय सरकार आहे, चला देश सोडून जाऊ, असे त्यांना वाटत असे. परंतु वर्षांनतर आता परिस्थिती बदलली असून त्यांना आता भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. लोकांना परिवर्तन हवे होते, ते झाले आणि त्यामुळेच अभिमान वाटतो’, असा दावा मोदी यांनी भारतीय समुदायासमोर भाषण करताना केला होता. सोल येथेही मोदी यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. त्यावर ‘महाराणा प्रतापलाही मोदी पंतप्रधान होईपर्यंत देशाचा अभिमान वाटत नव्हता,’ असा सणसणीत टोला ट्विटरकरांनी हाणला आहे.
 विकासाचे स्वप्न दाखवून मोदी यांनी सत्ता काबीज केली. परंतु आजही देशभरातील वीज समस्या, चांगल्या रस्त्यांचा अभाव, भ्रष्टाचार आदी मुद्दे तसेच कायम असून वर्षभरात फारसा फरक पडलेला नाही. मोदी यांनी परदेश दौरे करूनही भारतात परदेशी गुंतवणूक होऊ शकलेली नाही किंवा कामगारांची आंदोलनेही कायम असून एकूण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही, असा शेरा चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने ठेवला होता.

एक समय था, जब लोग – क्या पता नही पीछले जनम में क्या पाप किया था हिंदुस्थान मे पैदा हुए. ये कोई देश है, ये कोई लोग है, ये कोई सरकार है। चलो छोडो चले जाए कहीं ओर और लोग निकल पडते थे।  नरेंद्र मोदी</strong>

मी इंग्लंडमध्ये जन्मलो, पण भारतीयत्व स्वीकारले आणि प्रधानमंत्री जी जगभर फिरताना मला माझा भारतीय पासपोर्ट दाखवायला कधीही लाज वाटली नाही. – ओमर अब्दुल्ला