पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी वाराणसी मतदार संघात जाऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मोदींनी आणखी नऊ जणांना ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. मुंबईच्या डबेवाल्यांचा उल्लेख करून मोदींनी त्यांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. डबेवाल्यांसोबत माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली आणि हास्यकलाकार कपिल शर्मा याशिवाय माजी प्रशासकीय अधिकारी किरण बेदी, नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य, नृत्यांगना सोनल मानसिंग, इनाडू गुप्रचे रामोजी राव, इंडिया ग्रुपचे अरुण पुरी तसेच चार्टड अकाऊंटंट्सची संघटना (आयसीएआय) यांना देखील मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी निमंत्रित केलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱयावर आहेत. वाराणसीत दाखल होताच भारतरत्न जाहीर करण्यात आलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला मोदींनी आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी वाराणसीच्या अस्सी घाटाची पाहणी देखील केली. यावेळी बोलताना, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी देशात सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला आजवर उदंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगत अभियानाला हातभार लावणाऱया सर्वांचे मोदींनी अभिनंदन केले. तसेच वाजपेयींच्या जन्मदिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करताना पारदर्शी आणि स्वच्छ कारभार देणे सरकारची जबाबदारी असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. लोकांचे प्रश्न सोडवणे ही प्राथमिकता आणि त्यासाठी कटीबद्ध असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.