भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिक आणि थेट बोलणारे राजकारणी असून त्यांचा भारताविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट असल्याचे मत अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मते मोदी प्रामाणिक आणि थेट बोलणारे राजकारणी आहेत. मोदी यांचे अनेक गोष्टींवर प्रभुत्व असून भारतापुढे असलेल्या समस्यांची त्यांना चांगली जाण असल्याचे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
पॅरिस येथील जागतिक हवामानविषयक परिषदेत सोमवारी मोदी आणि ओबामा यांची भेट झाली होती. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासूनची मोदी आणि ओबामा यांची ही सहावी भेट आहे.
मोदी यांच्याकडे भारताला निश्चित दिशेने पुढे नेण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच ते एक प्रभावशाली राजकारणी आणि पंतप्रधान आहेत. राजकारणी म्हणून मोदींच्या याच गुणांचा आणि कौशल्याचा ओबामा आदर करतात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधानपद सांभाळणे अत्यंत आव्हानात्मक आहे. पण नरेंद्र मोदींच्या क्षमतेबद्दल ओबामांना खात्री आहे आणि ते त्यांचा आदरही करतात, असे अर्नेस्ट यांनी म्हटले.