लोकसभेतील गटनेते अधिर रंजन यांचा दावा; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला सुरुवा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचा प्रस्ताव ठेवताना केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी आणि या प्रस्तावाला अनुमोदन देताना भाजपच्या नंदुरबारमधील खासदार हीना गावित यांनी मोदींच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळली! मोदींच्या नेतृत्वामुळेच भारताला जगभरात सन्मान मिळत असून देशाची विश्वासार्हता निर्माण झाली असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही सदस्यांनी केला. त्यांचा हा दावा खोडून काढत काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन यांनी मोदींच्या सन्मानाचे श्रेय काँग्रेसने इतक्या वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांना दिले.

मोदी सरकारच्या कालखंडातच विकास झाला असल्याचा दावा सत्ताधारी सदस्य करत असले तरी विकासाची मूलभूत कामे काँग्रेसच्याच काळात झालेली आहेत. हरित क्रांती, श्वेतक्रांती, डिजिटल क्रांती कोणाच्या कालखंडात झाली? अणुकार्यक्रमाची सुरुवात नेहरू आणि होमी भाभांच्या दूरदृष्टीमुळे झाली. काँग्रेस हीच भारताची ओळख आहे, काँग्रेसमुळेच भाजपही आहे. काँग्रेसमुळेच आज मोदींचा सन्मान होतो. त्यांचे जगभर स्वागत होते. काँग्रेसने विकासाचा पाया रचला त्यावर आता मोदींचे सरकार विकासाची इमारत बांधू शकेल. त्यामुळे देशासाठी काँग्रेसचे योगदान नाकारू नका, अशी परखड समज अधिर रंजन यांनी दिला.

मोदींमुळे देशाला विश्वासार्हता-सारंगी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचा प्रस्ताव केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी यांनी ठेवला. दोन तासांच्या भाषणात सारंगी यांनी हिंदी, इंग्रजी, ओडिया, संस्कृत, बंगाली अशा विविध भाषांमध्ये मोदी सरकारच्या कारभाराचे कौतुक केले. मोदी सरकारमुळेच देशाचा विकास झाला असून जगभरात भारताला मोदींमुळेच सन्मान मिळाला आहे. भक्कम नेतृत्व काय असते हे मोदींमुळेच देशाला कळले, अशी स्तुतिसुमने सारंगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाहिली. सारंगी यांनी मोदींची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. मोदींमुळे देशाला विश्वासार्हता मिळाली. सौदी अरेबियानेही मोदींचा सन्मान केला. हा देशाचाही सन्मान आहे पण, काँग्रेसने कधीही कौतुक केले नाही. हे कसले पीडादायक जीवन, अशी टिप्पणी करत काँग्रेसला धारेवर धरले. ज्यांना भारताचे तुकडे करायचे आहेत, ज्यांना वंदेमातरम् म्हणणे मान्य नाही अशांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असा दावा सारंगी यांनी केला.

देशाची संस्कृती-परंपरा यांचा विरोधकांनी नम्रपणे स्वीकार केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसच्या दहा वर्षांच्या कालखंडात कुशासन झाले. भ्रष्टाचार झाला. काँग्रेसचे पंतप्रधानही निमित्तमात्र पंतप्रधान होते, असा आरोप सारंगी यांनी केला.

सोनिया-राहुल बाहेर कसे?

कथित टू जी आणि कोळसा घोटाळ्यात मोदी सरकारला एकाला तरी दोषी ठरवता आले का? सोनिया आणि राहुल गांधी यांना तुम्ही तुरुंगात पाठवू शकला का? त्यांनी भष्ट्राचार केल्याचा आरोप, त्यांना चोर म्हणून हिणवत तुम्ही सत्तेवर आलात. आज सोनिया, राहुल सभागृहात कसे बसले, असा सवाल करत अधिर रंजन यांनी मोदी सरकारवर टीका केली.

विकास गरिबांपर्यंत पोहोचला-गावित

विकास योजना गरिबांपर्यंत पोहोचल्यामुळेच मोदी सरकारला मतदारांनी पुन्हा सत्तेवर बसवलेले आहे. इतकी वष्रे विरोधकांच्या हाती सत्ता होती पण, त्यांनी केले काय? विकासाची खोटी आश्वासने देऊन लोकांची फसगत केली. त्याची शिक्षा मतदारांनी दिली आहे, अशी टीका खासदार हीना गावित यांनी केली. युवराजांना तर मुख्य मतदारसंघ सोडून दक्षिणेत पळून जावे लागले, असा टोला गावित यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता हाणला. गेल्या लोकसभा निवडणुकीत २८४ जागा मिळाल्या आता एवढय़ा जागा मिळणार नाहीत.

भाजपचा पराभव होईल असे राजकीय पंडित भविष्य वर्तवत होते. पण, मतदारांचा कौल मोदींना असल्याचा अंदाज देखील त्यांना आला नाही. मोदींच्या नेतृत्वामुळेच देशाचा विकास होत असल्याचा दावा हीना गावित यांनी केला.

ही विसंगती नव्हे का?

महात्मा गांधींची दीडशेवी जयंती मोदी सरकार साजरी करत आहे. पण, सत्ताधारी भाजपचे खासदार महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा देशभक्त म्हणून गौरव करत आहेत. ही विसंगती नव्हे का, असा सवाल अधिर रंजन यांनी केला. भेदभावाचे राजकारण कितीही केले तरी महात्मा गांधींचे विचार कायम राहतील, असे रंजन म्हणाले. त्यांच्या भाषणावेळी पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित होते.

अभिनंदनची मिशी

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे काँग्रेस गटनेत्यांनी कौतुक केले. अभिनंदन यांचा सरकारने सन्मान करायला हवा. त्यांची मिशी ही खास ओळख असून ती ‘राष्ट्रीय मिशी’ म्हणून नावाजली पाहिजे, असे अधिर रंजन म्हणाले.