नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यावर होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली असली तरी चार राज्यांचा निकाल आणि मोदींचे नेतृत्व यांचा संबंध जोडणे योग्य ठरणार नाही. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुद्दे वेगळे असतात, असे स्पष्ट करीत भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी गुगली टाकली आहे.
चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांवर पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याने या निवडणुका काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. चारही राज्यांच्या निवडणुका जिंकून काँग्रेसचा ४-० पराभव करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत यश मिळावे म्हणून मोदी यांनी शड्डू ठोकला आहे. चारही राज्यांमध्ये प्रचारासाठी सभा घेत आहेत. राज राज्यांच्या विधानसभा निकालांवर मोदी यांचे भवितव्य ठरणार आहे. ही पाश्र्वभूमी असली तरीही चार राज्यांच्या निकालाचा आणि मोदी यांच्या नेतृत्वाचा संबंध जोडला जाऊ नये, अशी अपेक्षा राजनाथ सिंग यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
विधानसभा निवडणुका या स्थानिक प्रश्न वा मुद्दय़ांवर लढल्या जातात. चारही राज्यांमधील प्रश्न वेगळे आहेत. लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय मुद्दय़ावर लढविली जाते. विधानसभा निवडणुकीत तसे नसते, असे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत यश न मिळाल्यास ते नरेंद्र मोदी यांचे अपयश असेल का, या प्रश्नावर राजनाथ सिंग यांनी, मुळात हा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे सांगितले. मात्र चारही राज्यांमध्ये भाजप जिंकेल व काँग्रेस सेमीफायनलमध्ये पराभूत होईल, असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.
चारही राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोदी यांची कसोटी असली तरी मोदी हाच केंद्रबिंदू ठेवण्याचे भाजपने टाळले आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंग किंवा राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांची ताकद आहे किंवा हे नेते लोकप्रिय आहेत. अशा परिस्थितीत केवळ मोदी यांना महत्त्व देण्याचे सिंग यांनी टाळले आहे.
केवळ मोदी यांनाच महत्त्व देण्यास भाजपमधील काही नेत्यांचा विरोध आहे. हे सारे लक्षात घेऊनच राजनाथ सिंग यांनी मोदी हा केंद्रबिंदू टाळल्याचे बोलले
जाते.
चारही राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोदी यांची कसोटी असली तरी मोदी हाच केंद्रबिंदू ठेवण्याचे भाजपने टाळले आहे.