पाकिस्तान भारताला उपद्रव देत असून दहशतवाद पसरवित आहे, असा जो आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बांगला देश दौऱ्यात केला होता तो दुर्दैवी आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते काझी खलिलुल्ला यांनी सांगितले, की भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधाला पंतप्रधान मोदी उपद्रव म्हणत असतील, तर ते दुर्दैवी आहे. पाकिस्तानचा शांततामय सहअस्तित्वावर विश्वास आहे व भारताशी आम्हाला चांगले संबंध हवे आहेत.
‘पाकिस्तान आये दिन डिस्टर्बस इंडिया, जो नाको दम ला देता हैं, टेररिझम को बढावा देता हैं. घटनाये घटती रहती हैं, १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानचे ९० हजार युद्धकैदी भारताच्या ताब्यात होते व जर आमची मनोवृत्ती वाईट असती, तर आम्ही तेव्हा काय निर्णय घेतला असता हे माहीत नाही,’ असे मोदी यांनी रविवारी ढाका विद्यापीठातील भाषणात सांगितले होते.
खलिलुल्ला यांनी सांगितले, की मोदी यांच्या विधानाने पाकिस्तानबाबत भारताचा नकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट झाला. भारतीय नेते नेहमीच संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचे उल्लंघन त्यांच्या कृतीतून करीत असतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करीत असतात. पाकिस्तान व बांगलादेशातील लोक मजबूत धार्मिक धाग्याने जोडलेले आहेत, शिवाय त्यांनी वसाहतवादी राजवटीविरोधात स्वातंत्र्याचा लढाही मिळून लढलेला आहे. पाकिस्तान व बांगलादेश यांच्यात वैमनस्य निर्माण करण्याचे भारताचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. भारत बांगलादेशात जाऊनही पाकिस्तानच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करीत आहे याची नोंद आंतरराष्ट्रीय समुदायाने घ्यावी.