पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा गुजरात, मध्य प्रदेश सरकारचा प्रस्ताव लवकरच गुंडाळण्यात येणार आहे. खुद्द पंतप्रधानांनीच या प्रस्तावाबद्दल नाखुशी व्यक्त केली आहे. जिवंत लोकांची जीवनकथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर दोन्ही सरकारांनी शुक्रवारी तातडीने हा निर्णय मागे घेतला.
दोन्ही राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी हा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी तयार केला होता. मोदींच्या जीवनातील सचोटीचे क्षण आणि त्यांनी मिळवलेल्या यशाची गाथा वाचून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्देश होता. परंतु पंतप्रधानांनीच त्याला विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.
मोदींनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, कोणत्याही जिवंत व्यक्तीचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करू नये, असे मला वाटते.
पंतप्रधानांनी आपल्याला फोनवरून निर्णय मागे घेण्यास सांगितले, अशी माहिती गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंदरसिंह चुडासामा यांना सांगितले. प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपला जीवन इतिहास शिकवणे आपल्याला योग्य वाटत नाही. जिवंत लोकांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला प्रस्ताव मागे घ्यावा, अशा शब्दांत मोदींनी नाराजी व्यक्त केली.