पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडीओवरील आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना जयंतीदिनी अभिवादन करताना त्यांच्या कामगिरीचे आवर्जुन कौतुकही केले. दरम्यान, मोदींनी देशवासियांना संबोधित करताना करोना, लॉकडाउन, अनलॉक, मान्सून, भारत-चीन वाद यांसह अनेक बाबींवर भाष्य केले.

मोदी म्हणाले, “आज २८ जून रोजी भारत आपले माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना अभिवादन करीत आहे. आजपासूनच त्यांची जन्मशताब्दी सुरु होत आहे. ते एक सर्वसामान्य राजकीय नेते होते. अनेक भाषांचे त्यांना ज्ञान होते. आपल्या निर्णयावर ते कायमच ठाम राहत असत. नरसिंहराव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. त्यांनी १९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. त्यांना परमीट राज संपवण्यासाठी जबाबदार धारले जाते तसेच त्यांनी राजीव गांधी सरकारची समाजवादी धोरणं बदलली होती. त्यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हणूनही ओळखण्यात येते.”

नवी दिल्लीमध्ये सन २००४ मध्ये माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबादमध्ये त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते. त्यांना राजकारणाशिवाय विविध विषय जसे साहित्य आणि सॉफ्टवेअरची चांगली जाण होती. ते १७ भाषा बोलू शकत होते. मात्र, त्यांना आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.

भारत मैत्रीसह डोळ्यात डोळे घालून उत्तर देणंही जाणतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये म्हटलं की, “नुकतीचं जगानं आपल्या सीमा आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारताची वचनबद्धता पाहिली आहे. लडाखमध्ये भारताच्या भूमीवर डोळे वटारुन पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तरही देण्यात आलं आहे. भारताला जसं मैत्री निभावणं माहिती आहे तसंच डोळ्यात डोळे घालून पाहणं आणि योग्य उत्तर देणंही माहिती आहे.”