पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील उमेदवारीपासून आत्तापर्यंतच्या प्रवासात नरेंद्र मोदी नेहमीच जनमानसातील स्वत:च्या छबीविषयी विशेष जागरूक राहिले आहेत. अनेक व्यासपीठांवर त्यांनी काढलेले ‘सेल्फी’ किंवा ‘मन की बात’सारखे कार्यक्रम पाहता ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. मोदींची इतरांसमोर स्वत:ला सादर करण्याची ओढ किती प्रखर आहे याचाच अनुभव रविवारी फेसबुकच्या मुख्यालयात आला. यावेळी मोदींनी स्वत: कॅमेऱ्यामध्ये नीट दिसावेत यासाठी चक्क फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गलाच दंडाला धरून बाजुला सारले. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या कृतीमुळे मार्क झकरबर्गचा ओशाळवाणा झालेला चेहराही व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
फेसबुकच्या मुख्यालयातील प्रश्नोत्तरांच्या तासानंतर हा सगळा प्रकार घडला. यावेळी मोदी फेसबुकच्या सीओओ शेरेल सँडबर्ग यांच्याशी बोलत उभे होते. तेव्ही शेरेल यांनी मोदींना फेसबुकतर्फे स्मृतिचिन्ह दिले. हा क्षण टिपण्यासाठी तेथली अनेक छायाचित्रकार प्रयत्न करत होते. मात्र, नेमका तेव्हाच मोदी आणि शेरेल यांच्याबरोबर उभा असलेला मार्क झकरबर्ग कॅमेऱ्याच्या दिशेने पाठ करून उभा होता. त्यामुळे मोदी आणि शेरेल यांचे छायाचित्र काढण्यात अडचण येत होती. ही गोष्ट मोदींच्या लक्षात येताच त्यांनी कसलीही तमा न बाळगता थेट झुकरबर्गचा दंड पकडून त्याला आपल्या मार्गातून बाजूला सारले. त्यानंतर छायाचिकरांनी मोदींची मनसोक्त छायाचित्रे काढली खरी पण त्यामध्ये झकरबर्गच्या चेहऱ्यावरील उडालेला रंगही स्पष्टपणे टिपला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून सध्या फेसबूक आणि तत्सम समाजमाध्यमांवर अनेक मनोरंजक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.