News Flash

काश्मीर प्रश्न द्विपक्षीयच!

ट्रम्प यांच्या उपस्थितीत मोदी यांनी त्रयस्थ देशाची मध्यस्थी फेटाळली

(संग्रहित छायाचित्र)

काश्मीर प्रश्न हा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यापुरता असल्याचे स्पष्ट करीत त्यात त्रयस्थ देशाने मध्यस्थी करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत सोमवारी सपशेल फेटाळून लावली.

आपापसातील प्रश्न भारत आणि पाकिस्तान चर्चा करून सोडवू शकतात. त्यासाठी अन्य तिसऱ्या देशाला नाहक त्रास देण्याची आमची इच्छा नाही, असेही मोदी यांनी नमूद केले. फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-७ परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर उभय नेते पत्रकारांशी बोलत होते.

भारत आणि पाकिस्तान १९४७ पूर्वी एकत्र होते आणि आता हे दोन्ही शेजारी देश उभयपक्षी समस्यांवर चर्चा करून त्यातून मार्ग काढू शकतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

निवडणुकीनंतर आपण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानला गरिबीविरुद्ध लढावे लागेल, भारतालाही त्याविरुद्ध लढावे लागेल. पाकिस्तानला निरक्षरता आणि रोगराईशी लढावे लागेल, भारतालाही त्याविरुद्ध लढावे लागेल. त्यामुळे आपण दोघांनी जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित काम केले पाहिजे, असे त्या वेळी आपण इम्रान खान यांना सांगितल्याचे मोदी म्हणाले.

रविवारी रात्री आपण काश्मीर, व्यापार, लष्करी संबंध आणि अन्य विषयांवर मोदी यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा उत्तम झाली. त्यातून आपल्याला भारताबद्दल अधिक माहिती मिळाली, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

भारताच्या भूमिकेला ट्रम्प यांचा पाठिंबा!

मोदी यांच्याशी आपण रविवारी रात्री काश्मीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न स्वत:च सोडवावा, असे आपले मत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसमक्ष पत्रकारांना सांगितले. काश्मीरमधील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे मोदी यांना वाटत आहे. त्यांनी पाकिस्तानशी चर्चा केल्यास काही तरी चांगलेच निष्पन्न होईल याची आपल्याला खात्री आहे, असेही ट्रम्प म्हणाले. मोदी आणि खान यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. आपणही येथे आहोत. मोदी आणि खान स्वत:च प्रश्न सोडवतील, असेही ट्रम्प म्हणाले.

व्यापार मंत्र्यांमध्येही चर्चा होणार

अमेरिकेच्या उत्पादनांवर भारताने लागू केलेल्या वाढीव आयात शुल्कावरून उभय देशांत मतभेद निर्माण झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर मोदी आणि ट्रम्प यांच्यात सोमवारी झालेल्या ४० मिनिटांच्या चर्चेत व्यापार संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. मोदी पुढील महिन्यात अमेरिकेला जात आहेत. त्यावेळी भारत आणि अमेरिकेच्या व्यापार मंत्र्यांमध्येही चर्चा होईल, असे ठरले.

आज आर्थिक हितसंबंधांमुळे मुस्लीम देशही काश्मीर प्रश्नावर बोलत नाहीत, पण हे चित्र पालटेल. संयुक्त राष्ट्र आमसभेत मी काश्मीरवर बोलणार आहे.

– इम्रान खान, पाकिस्तानचे पंतप्रधान

मोदी आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा आणि ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या बाजूने अवाक्षरही न काढणे, ही पाकिस्तानच्या धडपडीला मिळालेली मोठी चपराक आहे.

– जी. व्ही. एल. नरसिंहराव, भाजप प्रवक्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:27 am

Web Title: modi rejects third party mediation in trumps presence abn 97
Next Stories
1 प्लास्टिकमुक्तीवर मोदी यांचा भर
2 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवे विझविण्यास जी-७ देशांची मदत
3 महाराष्ट्र, झारखंडमध्ये ‘संयुक्त जद’ला ‘बाण’ चिन्हाच्या वापराला मनाई
Just Now!
X