पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्राला उत्तर देऊन शांततेची अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील वातावरण हिंसाचार आणि तणावमुक्त करून मैत्रीचा नवा अध्याय सुरू करू या, असे मोदी यांनी शरीफ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
शरीफ यांनी २ जून रोजी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मोदी यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील संबंध शांतता, मैत्री आणि सहकार्यावर आधारित असावेत. त्याचप्रमाणे युवकांसाठी नव्या संधी, उज्ज्वल भवितव्य आणि प्रादेशिक प्रगतीकडे वाटचाल करू या, असेही मोदी यांनी म्हटले आहे. कराची विमानतळावर अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मोदी यांनी निषेध केला असून, या हल्ल्यात जे निरपराध ठार झाले त्यांच्याबाबत सहवेदना व्यक्त केली आहे.
मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी शरीफ भारतात आले होते. तेव्हा झालेल्या चर्चेबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले होते. आपण आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक नेते समारंभाला उपस्थित होते, त्यामुळे केवळ त्या समारंभाची शोभा वाढली नाही, तर त्यामुळे लोकशाही अधिक सुदृढ झाली, असेही मोदी यांनी म्हटले आहे.