ठोस विकासकामांऐवजी निवडणुका जिंकण्यासाठी केवळ धर्मादाय करून ग्रामीण भारतातील परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदी यांनी आता पहिला हल्ला केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास योजनांकडे वळविला आहे.
ग्रामीण भागात कल्याणकारी योजनांबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने पावले उचलली असून त्यावर प्रथमच मोदी यांनी हल्ला चढविला आहे. मनरेगासारख्या अनेक लोकप्रिय योजना राबविल्याने जनता स्वयंपूर्ण होणार नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे. ग्रामीण विकास जबाबदारीने व्हावयास हवा, परंतु सध्या देशात धर्मादायाचे वारे वाहत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी केंद्र सरकारपुढे अन्य पर्याय नाही, असेही मोदी म्हणाले. त्यामुळे ठोस विकास गरजेचा असून त्याद्वारेच जनता स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असेही त्यांनी नमूद केले.