सोशल मीडियातून बाहेर पडण्याबाबत दिलेल्या सूचक माहितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दिल्लीतील हिंसाचारावरुन भावूक झालेले पहायला मिळाले. भाजपाच्या बैठकीत दिल्ली हिंसाचाराचा थेट उल्लेख न करता “देशात शांतता आणि एकता गरजेची आहे”, असे सांगताना मोदी भावूक झाले.

पार्लमेंट लायब्ररीच्या इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी आपला ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाचा पुनरुच्चार करताना ‘सबका विश्वास’ही गरजेचा असल्याचे म्हटले. यावेळी ‘पहिल्यांदा देश नंतर पक्ष’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधानांनी २६ फेब्रुवारी रोजी ट्विटद्वारे पहिल्यांदा भाष्य केले होते. हिंसाचारानंतर ६९ तासांनंतर त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारे भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमारही झाला होता.

आणखी वाचा- पंतप्रधान मोदी आणणार भारतीय सोशल मीडिया? रविवारी घोषणेची शक्यता

दरम्यान, मोदींनी सोमवारी रात्री ट्विट करीत आपण सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन बाहेर पडणार असल्याचे सूचक विधान केले. तसेच याबाबत आपण रविवारी बोलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोदींच्या या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मोदींकडून नव्या भारतीय सोशल मीडियाची घोषणा करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.